Chinchwad : सागरमाथा संस्थेच्या वतीने गिर्यारोहण छायाचित्र प्रदर्शनाचे आयोजन

एमपीसी न्यूज – सागरमाथा गिर्यारोहण संस्थेने मागील अकरा वर्षात गिर्यारोहण क्षेत्रात केलेली कामगिरी पिंपरी-चिंचवडकरांना प्रदर्शनाच्या माध्यमातून पाहता येणार आहे. संस्थेने दोन दिवसीय छायाचित्र प्रदर्शन आयोजित केले आहे. हे प्रदर्शन येत्या शनिवारी (दि. 6) आणि रविवारी (दि. 7) चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहाच्या कलादालनात होणार आहे. प्रदर्शन सकाळी दहा ते सायंकाळी आठ पर्यंत सर्वांसाठी मोफत खुले असणार आहे.

छायाचित्र प्रदर्शनाचे उद्धाटन शनिवारी होणार आहे. यावेळी आमदार लक्ष्मण जगताप, महेश लांडगे, महापौर राहूल जाधव, आयुक्त श्रावण हर्डीकर आदी उपस्थित राहणार आहेत. गडकोटाबरोबरच हिमालयीन माउंटेनियरिंग मोहिमा, वाईल्ड लाईफ व निसर्गाच्या छायाचित्रांसह विविध सामाजिक उपक्रमांची सुमारे पाचशे छायाचित्रे पाहायला मिळणार आहेत.

  • सह्याद्रीमधील प्रस्तरारोहण, भटकंती मोहिमा, हिमालयीन गिर्यारोहण मोहिमा तसेच गडकिल्ल्यांचे महत्व व दुर्गसंवर्धनाची गरज याविषयी या प्रदर्शनाच्या माध्यमातून संदेश पोहोचवला जाणार आहे. संस्थेच्या माध्यमातून सह्याद्रीमधील अनेक अवघड प्रस्तरारोहण मोहिमा, हिमालयातील नामांकित सुमारे दहापेक्षा अधिक हिमशिखरांवरील पर्वतारोहण मोहिमांचे यशस्वी आयोजन केले आहे. सागरमाथाच्या मिशन एव्हरेस्ट 2012 या मोहिमेच्या यशाने शहराच्या नावलौकिकात मनाचा तुरा रोवला आहे.

गडांच्या संवर्धनासाठी किल्ल्यांवर श्रमदान मोहिमा राबवल्या. किल्ल्यांच्या प्रभावळीतील गावक-यांसाठी जनजागृतीपर व्याख्याने, शालेय विद्यार्थ्यांसाठी दुर्गदर्शन आणि दुर्गवाचन उपक्रम, ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी ग्रंथदिंडी, वृक्षारोपण आदी उपक्रम यशस्वीपणे राबवून एक वेगळा विचार संस्थेने समाजासमोर मांडला आहे. त्याचेही दर्शन या प्रदर्शनातून होणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.