Chinchwad : ओरिएंटल मार्वल गृहनिर्माण सोसायटीची शून्य कचऱ्याकडे वाटचाल

एमपीसी न्यूज – घनकचऱ्याचे प्रदूषण व त्याची योग्य विल्हेवाट ही जगापुढील एक मोठी समस्या बनली आहे. येणाऱ्या काळाची गरज ओळखून चिंचवड मधील ओरिएंटल मार्वल या गृहनिर्माण सोसायटीने तयार होणाऱ्या कचऱ्याचे योग्य व्यवस्थापनाची सुरुवात केली आहे. इ-कचरा व प्लास्टिक कचरा जमा करण्याची मोहीम हाती घेतली आहे. ओरिएंटल मार्वल 155 सदनिका असलेली गृहनिर्माण संस्था आहे.

सोसायटीने ही मोहीम सुरु करण्यापूर्वी कचरा व्यवस्थापन समितीचे गठन करून आराखडा बनविला आहे. समितीमध्ये महिलांचा सहभाग असेल याची दक्षता घेतली आहे. कोणतीही मोहीम यशस्वी करण्या साठी सर्व सदस्यांचा सहभाग जरुरीचा असतो. यासाठी सोसायटीमध्ये जागरूकता मोहीम राबवण्यात आली. या कामाकरिता महापालिकेच्या प्रभाग क्रमांक 18 चे आरोग्य निरीक्षक कांचनकुमार इंदलकर यांची मोलाची साथ मिळाली. त्यांनी स्वतः सोसायटीमध्ये येऊन सभासदांना मार्गदर्शन केले.

तसेच चिंचवडमधील गोखले वृंदावन सोसायटीतील केळकर आणि वैद्य यांनी त्यांचे कचरा व्यवस्थापनाचे अनुभव सांगून मोलाचे मार्गदर्शन केले. जागरूकता आणि प्रशिक्षण झाल्यानंतर सर्व सभासदांना कचरा वेगळा करूनच कामगारांना देण्याचे आवाहन करण्यात आले. या आव्हानास सर्व सभासदांनी उत्स्फूर्तपणे प्रतिसाद देत तीन दिवसांमध्ये ओला आणि सुका कचरा वेगळा करण्यात यश मिळवले.

याच मोहिमेचा एक भाग म्हणून सोसायटी मध्ये 24 नोव्हेंबर रोजी ‘पुर्णम इकोव्हिजन फौंडेशन” यांच्या सहयोगाने इ – कचरा व प्लास्टिक कचरा जमा करण्याची मोहीम राबविली. पुर्णम संस्था या कचऱ्याचे योग्य पद्धतीने प्रक्रिया व पुनर्वापर करणारी सामाजिक संस्था आहे. या मोहिमेलासुद्धा सोसायटीतील सभासदांनी भरघोस प्रतिसाद देत दोन तासांत 100 किलो इ – कचरा आणि प्लास्टिक जमा केले.

ही मोहीम यशस्वी होण्यासाठी आणि लहान मुलांमध्ये जागरूकता वाढवण्यासाठी सोसायटीमध्ये स्वच्छता व कचरा व्यवस्थापन या विषयावर चित्रकला व प्रश्नमंजुषा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमास सोसायटीतील जवळपास 50 मुलांनी सहभाग घेतला. जमा केलेल्या वस्तूंची पुर्णम संस्थेतर्फे योग्य ती प्रक्रीया व पुनर्वापर केला जाऊन पर्यावरण व सामाजिक बांधिलकीचे भान राखले जाते.

या पुढील मोहिमेत सोसायटीने तयार होणाऱ्या ओल्या कचऱ्याचे सोसायटीच्या आवारातच प्रक्रिया करून खत निर्मिती करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. सर्व सभासदांचा प्रतिसाद पाहता सोसायटी हे पण उद्दिष्ट यशस्वीपणे साध्य करेल यात शंका नाही, असे विश्वास सोसायटीचे सभासद योगेश लंके यांनी व्यक्त केला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.