Chinchwad : ग्लोबल इंडियन इंटरनॅशनल स्कूलच्या नामांतराने पालक संतप्त

एमपीसी न्यूज- चिंचवड श्रीधरनगर येथील ग्लोबल इंडियन इंटरनॅशनल स्कूलचे नाव बदलून एलप्रो इंटरनॅशनल स्कूल असे केल्याच्या कारणावरून पालकांमध्ये तीव्र संताप निर्माण झाला आहे. आज सकाळी हा प्रकार उघडकीस आला . त्यामुळे शाळेच्या परिसरातील वातावरण तणावपूर्ण झाले असून या संपूर्ण प्रकाराचा जाब विचारण्यासाठी या ठिकाणी जमलेल्या पालकांना शाळेमध्ये प्रवेश दिला जात नसल्यामुळे पालकांनी शाळेसमोर ठिय्या आंदोलन सुरू केले आहे.

आम्ही आमच्या मुलांना इंटरनॅशनल स्कूल म्हणून शाळेत प्रवेश घेतला. आता ही शाळा लोकल झाल्यामुळे आमच्या पाल्यांच्या शिक्षणाचा प्रश्न उपस्थित झाला आहे. वास्तविक याबाबत किमान वर्षभर आधी या बदलाची कल्पना पालकांना देणे अपेक्षित असताना आठवड्यापूर्वी केवळ एक मेल पाठवून या शाळेचे नाव १ ऑगस्टपासून ग्लोबल इंडियन इंटरनॅशनल स्कूल ऐवजी एलप्रो इंटरनॅशनल स्कूल असे करण्यात आल्याचे सांगण्यात आले असल्याचे या ठिकाणी जमलेल्या पालकांनी सांगितले.

याबाबत अधिक माहिती देताना रवी हिरोलीकर म्हणाले, ” या शाळेकडून मागच्या आठवड्यात अचानक मेल पाठवण्यात आला. त्यामध्ये शाळेचे नाव बदलून एल्प्रो इंटरनॅशनल स्कूल असे ठेवण्यात आल्याचे सांगण्यात आले. वास्तविक ग्लोबल इंडियन इंटरनॅशनल स्कूल हे ब्रँड नेम असल्यामुळे आणि या शाळेच्या विविध देशामध्ये शाखा असल्यामुळे सगळ्या पालकांनी आपल्या पाल्यासाठी या शाळेत प्रवेश घेतला. नाव बदलल्यामुळे सर्व पालकांना धक्का बसला आहे. ज्या ब्रॅण्डसाठी आम्ही अवाढव्य फी भरून प्रवेश घेतला. तो ब्रॅण्डचं आता नसणार असून त्यामुळे ही शाळा आता लोकल झाली आहे. या निर्णयामुळे पालकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागणार आहे”

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.