Chinchwad : ‘अभिव्यक्ती’ नृत्याने रसिक चिंब

एमपीसी न्यूज- रंगयात्रा आणि पायल नृत्यालय प्रस्तुत ‘अभिव्यक्ती’ या कथक नृत्याच्या सादरीकरणाने रसिक मंत्रमुग्ध झाले. विद्यार्थीनींच्या नृत्यप्रस्तुतीने रसिक चिंब झाले. प्रचंड प्रेक्षकांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला.

चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे सभागृहात शनिवारी (दि. 5) झालेल्या या कार्यक्रमाला प्रसिद्ध नृत्यांगना पं. मनीषा साठे, नाना दामले, प्रसिद्ध कथक नर्तक पं. नंदकिशोर कपोते उपस्थित होते.

प्रसिद्ध कथक नृत्यांगना पायल गोखले यांच्या शिवध्रुपदनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. त्यानंतर पंचम सवारी या तालात शृंगार थाट, आमद, तोडे, दुर्गा परन, तत्कार यांसारख्या रचना सादर करुन प्रेक्षकांची वाहवा मिळवली. पायल नृत्यालयाच्या 100 विद्यार्थींनींनी सरगम,चतरंग, सावन, पदन्यास, पोवाडा, लोकनृत्य, हनुमान स्तुती, झपताल इत्यादी रचना सादर केल्या.

कार्यक्रमाच्या शेवटी पायल गोखले यांनी भगवान शंकरने केलेले सात प्रकारचे तांडव नृत्य “शिव तांडव” या नृत्य संरचनेतून सादर करुन प्रेक्षकांची मने जिंकली.

या कार्यक्रमासाठी तबल्यावर विवेक भालेराव, संवदिनीवर लीलधर चक्रदेव, गायन अर्पिता वैशंपायन, बासरीवर आदित्य गोगटे तर पढंत मानसी भागवत आणि पायल गोखले यांनी केली. मीनल उम्ब्राणी यांनी सूत्रसंचालन केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.