Chinchwad: एम्पायर इस्टेट उड्डाणपुलावरून रँप-लूपसाठी महापालिकेने मागविल्या हरकती, सूचना

एमपीसी न्यूज – एम्पायर इस्टेट उड्डाणपुलावरून चिंचवड लिंक रस्ता येथे उतरण्यासाठी व चढण्यासाठी रँप किंवा लूप बांधण्यात येणार आहे. परंतु, त्यासाठी जागेची मंजूर विकास योजनेत तरतूद नसल्याने महापालिका अधिनियमातील तरतुदीनुसार 18 मीटर रूंदीचा रस्ता घोषित करण्यात येणार आहे. त्यासाठी नागरिकांकडून हरकती, सूचना मागविण्यात आल्या आहेत.

महापालिकेने याबाबत जाहीर नोटीस जारी केली आहे. महापालिका हद्दीतील काळेवाडी फाटा आणि देहू-आळंदी रस्त्यापर्यंतचा रस्ता बीआरटीएस कॉरिडॉर म्हणून विकसित करण्यात आला आहे. या रस्त्यामधील काळेवाडी पवना नदी ते चिंचवड लिंकरोड आणि पुणे-मुंबई लोहमार्ग व महामार्ग यांना ओलांडून चिंचवड ऑटोक्लस्टर बाजूकडे एम्पायर इस्टेट येथे उड्डाणपूल बांधण्यात आला आहे. या उड्डाणपुलावरून चिंचवड लिंक रस्ता येथे उतरण्यासाठी व चढण्यासाठी रँप किंवा लूप बांधणे आवश्यक आहे. त्यामुळे चिंचवड येथील नागरिकांना मोठा फायदा होणार आहे. तसेच पिंपरी कॅम्प, रिव्हर रस्ता या ठिकाणची सध्या होणारी वाहतुकही काही प्रमाणात कमी होण्यास मदत होईल.

या रँप किंवा लुपसाठी जागेची मंजूर विकास योजनेत तरतूद नाही. त्यामुळे चिंचवड येथील सर्व्हे क्रमांक 264, 266 , 265 येथील 45 मीटर मंजूर विकास योजना रस्त्याच्या दोन्ही बाजूस चढणे आणि उतरण्यासाठी रँपसाठीचा रस्ता घोषित करावा लागणार आहे. त्यानुसार, महाराष्ट्र महापालिका अधिनियमातील कलम 205 अंतर्गत 18 मीटर रूंदीचा महापालिका रस्ता घोषित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या घोषित करायच्या रस्त्याचा आराखडा नागरिकांच्या अवलोकनार्थ महापालिकेच्या नगररचना व विकास विभागात उपलब्ध करण्यात आला आहे. याबाबत कोणाचीही कोणत्याही प्रकारची हरकत किंवा सूचना असल्यास एक महिन्याच्या आत आवश्यक कागदपत्रांसह लेखी स्वरूपात करावी. या हरकती, सूचनांचा विचार करून रस्ता घोषित करण्यात येईल. मुदतीनंतर प्राप्त झालेल्या हरकती, सूचना विचारात घेतल्या जाणार नाहीत, असे नोटीशीत स्पष्ट केले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.