Chinchwad News : पिंपरी-चिंचवडचे एन्काउंटर स्पेशालिस्ट सहाय्यक पोलीस आयुक्त राम जाधव सेवानिवृत्त

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहराचे एन्काउंटर स्पेशालिस्ट म्हणून ओळख असलेले सहाय्यक पोलीस आयुक्त रामचंद्र जाधव आज (मंगळवार, दि. 31) सेवानिवृत्त झाले. त्यांच्यासोबत आणखी तीन पोलीस कर्मचारी देखील सेवानिवृत्त झाले असून सर्वांना पिंपरी-चिंचवड पोलीस दलाकडून निरोप देण्यात आला.

चाकण विभागाचे सहाय्यक पोलीस आयुक्त रामचंद्र जाधव, अतिक्रमण विभागात कार्यरत असेलेले सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक गणेश ठाकरे, सांगावी पोलीस ठाण्यात नेमणुकीस असलेले सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक संजय भालेराव आणि वाकड पोलीस ठाण्यात नेमणुकीस असलेले सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक किशोर शिंपी हे पोलीस दलातून नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त झाले.

पोलीस आयुक्त कार्यालयात झालेल्या सेवानिवृत्त अधिकारी, कर्मचा-यांच्या निरोप समारंभासाठी पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश, अपर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे, उपायुक्त आनंद भोईटे, सहाय्यक आयुक्त प्रशांत अमृतकर, सहाय्यक आयुक्त प्रेरणा कट्टे, सहाय्यक आयुक्त नंदकिशोर भोसले पाटील, पोलीस निरीक्षक राजेंद्र निकाळजे आदी उपस्थित होते.

सहाय्यक आयुक्त राम जाधव हे 1988 साली महाराष्ट्र पोलीस दलात भरती झाले. त्यांनी केलेल्या कामगिरीबाबत त्यांना दोन वेळा राष्ट्रपती पदकाने सन्मानित करण्यात आले आहे. तसेच त्यांना पोलीस महासंचालक यांचे देखील सन्मान चिन्ह / बोध चिन्ह मिळाले आहे. त्यांनी त्यांच्या सेवा काळात काही एन्काउंटर देखील केले. त्यातील काही प्रकरणे सकारात्मकतेने राज्यभर चर्चेत राहिली. त्यामुळे जाधव यांची ओळख एन्काउंटर स्पेशालिस्ट म्हणून झाली होती.

सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक गणेश ठाकरे 1985 साली पोलीस दलात भरती झाले असून त्यांना त्यांच्या सेवा काळात उत्कृष्ट सेवा केल्याबद्दल वरिष्ठांकडून 95 बक्षिसे मिळाली आहेत.

सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक संजय भालेराव हे 1986 साली पोलीस दलात भरती झाले. त्यांना त्यांच्या सेवाकाळात 140 बक्षिसे मिळाली आहेत.

तसेच सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक किशोर शिंपी हे देखील 1986 साली पोलीस दलात भरती झाले असून त्यांनाही त्यांच्या सेवाकाळात 140 बक्षिसे मिळाली आहेत.

पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश म्हणाले, तुम्ही निवृत्त झाले नाहीत. समाजामध्ये आणि पोलीस दलासाठी तुम्ही नेहमी पोलीसच राहणार आहात. पोलीस दलात येऊन कर्तव्य बजावणे ही एक अभिमानाचीच बाब आहे. पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयात पुढील काळात आपले केव्हाही स्वागत असेल. कोरोनाच्या कठीण काळात समाजासाठी आपण दिलेले योगदान कौतुकास्पद असल्याचे म्हणत आयुक्तांनी सेवानिवृत्त झालेल्या अधिकारी आणि कर्मचा-यांना पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.