Chinchwad : पदोन्नती मिळालेले अधिकारी कधी रिलीव्ह होणार ? पुणे, पिंपरी-चिंचवड आयुक्तालयाच्या वादात ‘त्या’ अधिका-यांचे पगार बंद

एमपीसी न्यूज – पोलीस उपनिरीक्षक पदावरून सहाय्यक पोलीस निरीक्षक पदावर बढती मिळून दोन महिन्यांचा कालावधी उलटला आहे. या अधिका-यांना पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयातून अदयाप रिलीव्ह करण्यात आले नाही. यामुळे बढती मिळूनही ‘त्या’ पोलीस उपनिरीक्षकांना पूर्वपदावर काम करावे लागत आहे. यामुळे बढती मिळालेल्या त्या अधिका-यांमध्ये नाराजीचे वातावरण आहे. त्यात पुणे पोलिसांच्या आस्थापनेवर असलेल्या मात्र, प्रत्यक्षात पिंपरी-चिंचवड शहरात कार्यरत असलेल्या चार अधिका-यांचे पगार देखील मिळणे बंद झाले आहे.

राज्यातील 1 हजार 558 पोलीस उपनिरीक्षकांची पदोन्नती करण्यात आली. याबाबतचे आदेश महाराष्ट्र पोलीस मुख्यालयातून 30 ऑगस्ट 2019 रोजी काढण्यात आले. राज्यातील इतर आयुक्तालये, अधीक्षक कार्यालयांमध्ये बढती झालेले अधिकारी हजर झाले आणि त्यांना पोस्टिंग देखील मिळाल्या आहेत. मात्र, पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयातील अधिका-यांना अजूनही सोडण्यात आलेले नाही. बढतीच्या ठिकाणी रुजू न झाल्यामुळे त्या पोलीस अधिकाऱ्यांना ज्यादा अधिकाराबरोबर वेतनवाढ, अन्य भत्ते आणि सुविधांपासून वंचित राहावे लागत आहे.

पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाला मनुष्यबळाची सर्वात मोठी अडचण आहे. त्यात ऐन मोक्याच्या वेळी अधिका-यांच्या बदल्यांचे आदेश आले असल्यामुळे त्यांना तात्काळ रिलीव्ह करणे सोयीचे नसल्याने त्यांना थांबवून ठेवण्यात आले. दरम्यान गणेशोत्सव, मोहरम, दसरा, विधानसभा निवडणूक, दिवाळी, अयोध्या निकाल या पार्श्वभूमीवर शहरात मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला. या सण उत्सवांना शहरात मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त ठेवण्यात येतो. कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी बाहेरून बंदोबस्त मागवला जातो. यामुळे देखील अधिकाऱ्यांना सोडण्यात आले नाही. बदली झालेल्या अधिकाऱ्यांना बदलीच्या ठिकाणी निवास आणि पाल्यांच्या शिक्षणाची देखील सोय करायची आहे. त्यामुळे त्यांच्यामध्ये अडचणीचे वातावरण आहे.

पोलीस उपायुक्त सुधीर हिरेमठ म्हणाले, “मागील काही दिवसांपासून बंदोबस्त सुरु होता. त्यामुळे बदली झालेल्या अधिकाऱ्यांना सोडण्यात आलेले नाही. बदली झालेल्या अधिकाऱ्यांना आज (गुरुवारी) सोडण्यात येईल”

पुणे पोलीस आयुक्तालयाने अनधिकृत ठरवलेल्या अन पिंपरी-चिंचवडमध्ये राबणा-या अधिका-यांचे पगारही बंद

पिंपरी-चिंचवड शहरासाठी 15 ऑगस्ट 2018 रोजी स्वतंत्र पोलीस आयुक्तालय सुरु झाले. मात्र, पुणे पोलीस आयुक्तालयाने 14 ऑगस्ट रोजी काही अधिकाऱ्यांच्या पुणे शहरात बदल्या केल्या. त्यातील 32 पोलीस अधिकारी पिंपरी-चिंचवड शहरात कार्यरत राहिले. त्यामध्ये एक पोलीस निरीक्षक, 23 सहाय्यक पोलीस निरीक्षक तर 8 पोलीस उपनिरीक्षक यांचा समावेश होता. फेब्रुवारी 2019 मध्ये पुणे पोलीस आयुक्तालयाने पोलीस महासंचालकांना 32 पोलीस अधिकारी अनधिकृतपणे पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयात कार्यरत असल्याचे पत्र पाठवल्याचे समोर आले. यावरून पुणे पोलीस आयुक्तालय आणि पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाचा वाद पुन्हा समोर आला.

पुणे पोलिसांच्या मते अनधिकृत असलेल्या आठ उपनिरीक्षकांपैकी चार उपनिरीक्षकांची पदोन्नतीने बदली झाली. बदलीच्या आदेशानंतर पुणे पोलिसांनी या चार उपनिरीक्षकांना रिलीव्ह केले. त्यामुळे पुणे पोलीस आयुक्तालयातून निघणारे त्यांचे पगार बंद झाले. मात्र, हे पोलीस उपनिरीक्षक प्रत्यक्षात पिंपरी-चिंचवड शहरात कार्यरत आहेत. पिंपरी-चिंचवड पोलिसांनी त्यांना रिलीव्ह न केल्याने ते अजूनही बदलीच्या ठिकाणी हजर झाले नाहीत. त्यामुळे त्यांचे पगार अजूनही सुरु झालेले नाहीत. अशी दुहेरी कुचंबणा या अधिका-यांना सहन करावी लागत आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
You might also like