Chinchwad : एकटे राहणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांच्या सेवेत पिंपरी चिंचवड पोलीस; वर्दीतील देवमाणसाचे ज्येष्ठांकडून कौतूक

एमपीसी न्यूज – पिंपरी चिंचवड शहरात एकटे राहणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांच्या मदतीला पोलिसांनी धाव घेतली आहे. वयोमानानुसार संचारबंदीच्या काळात बाहेर फिरता न येणाऱ्या तसेच कुणाचीही मदत न मिळणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांच्या सेवेत पिंपरी चिंचवड पोलीस दाखल झाले. ज्येष्ठांना फळे आणि आवश्यक वस्तू दिल्याने ज्येष्ठांनी देखील ‘वर्दीतला देव माणूस धावून आला’ अशा भावना व्यक्त केल्या आहेत.

देशभर संचारबंदी लागू झाल्याने अनेकजण विविध शहरात अडकून पडले आहेत. त्यांना त्यांच्या वृद्ध पालकांकडे येता आलेले नाही. तसेच ज्यांना कोणीही नातेवाईक नाही, असे देखील एकटे राहणारे अनेक ज्येष्ठ नागरिक शहरात आहेत. या नागरिकांना इतरांच्या मदतीशिवाय काही करता येत नाही. तसेच संचारबंदीच्या काळात बाहेर फिरण्यावर बंधन आले असल्याने त्यांची चांगलीच गोची झाली आहे. अशा नागरिकांची पिंपरी चिंचवड पोलिसांनी सोय केली आहे.

पिंपरी चिंचवड पोलिसांनी संचारबंदीच्या काळात एकटे राहत असलेल्या ज्येष्ठ नागरिकांच्या भेटी घेऊन त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. तसेच त्यांना आवश्यक खाद्य पदार्थ, फळे आणि जीवनावश्यक वस्तू दिल्या. पोलीस घरपोच मदत पोहोचवत असल्याने ज्येष्ठांना मोठा आधार मिळाला आहे.

ज्येष्ठ नागरिकांनी पोलिसांच्या या कामगिरीचे तोंडभरून कौतुक केले आहे. ‘वर्दीतला देवमाणूस मदतीला धावून आला’ अशा भावना देखील या ज्येष्ठ नागरिकांनी व्यक्त केल्या आहेत.

वाल्हेकरवाडीमध्ये जोशी समाजाच्या कुटुंबाला अन्नधान्य व मास्क वाटप
 कोरोना विषाणूचा वाढता पादुर्भाव कमी रोखण्यासाठी देशभर 21 दिवस संचारबंदी लागू करण्यात आली आहे. या कालावधीत गोरगरीब नागरिकांचे हाल होऊ नयेत यासाठी अनेक सामाजिक संघटना आणि पोलीस देखील समोर येत आहेत. चिंचवड पोलिसांनी वाल्हेकरवाडी येथील जोशी समाजाच्या कुटुंबाला अन्नधान्य देऊन मदतीचा हात दिला.
चिंचवड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र जाधव, पोलीस निरीक्षक (गुन्हे) विश्वजित खुळे यांच्या वतीने संदीप चिंचवडे आणि धनाजी वाल्हेकर यांच्या माध्यमातून वाल्हेकरवाडी परिसरात वास्तव्यास असणाऱ्या नंदीबैल घेऊन दारोदारी फिरुन उदरनिर्वाह करणा-या जोशी समाजातील कुटुंबाला 15 दिवस पुरेल एवढे अन्नधान्य आणि मास्क देण्यात आले.
चिंचवडे यांनी सामाजिक संस्था आणि नागरिकांच्या मदतीने नंदीबैलांच्या चा-याची व्यवस्था करण्याचे आश्वासन दिले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.