Chinchwad : पिंपरी चिंचवड पोलिसांकडून बुधवारी 326 जणांवर कारवाई

एमपीसी न्यूज – पिंपरी चिंचवड पोलिसांनी बुधवारी (दि. 6) 326 जणांवर कारवाई केली. लॉकडाऊनच्या कालावधीत प्रशासनाने दिलेल्या आदेशाचे पालन न केल्याबाबत ही कारवाई करण्यात आली आहे. लॉकडाऊन सुरू झाल्यापासून पोलिसांकडून ही कारवाई अविरत सुरू आहे.

4 मे पासून देशभरात लॉकडाऊनच्या तिसऱ्या टप्प्याला सुरुवात झाली आहे. हा तिसऱ्या टप्प्यातील लॉकडाऊन दोन आठवड्यांसाठी (4 ते 17 मे) लागू करण्यात आला आहे. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लॉकडाऊन जाहीर करण्यात आला असून यात संचारबंदी आणि जमावबंदीचे आदेश देण्यात आले आहेत. राज्यात साथरोग प्रतिबंधक कायदा लागू करण्यात आला आहे. यानुसार नागरिकांच्या अत्यावश्यक कामाशिवाय फिरण्यावर बंधने आली आहेत.

पिंपरी चिंचवड शहरात 21 भागात कंटेन्मेंट झोन (प्रतिबंधित क्षेत्र) तयार करण्यात आले आहेत. हे परिसर पूर्णतः सील करून लॉकडाऊनचे नियम कठोर करण्यात आले आहेत. अशी परिस्थिती असताना नागरिक अजूनही विनाकारण घराबाहेर फिरताना आढळून येत आहेत.

ही बाब दररोज होणाऱ्या कारवाईच्या आकड्यावरून स्पष्ट होत आहे. पोलीस देखील न कंटाळता नियमभंग करणाऱ्यांवर कारवाई करीत आहेत.

पिंपरी-चिंचवड शहरातील मोशी, मोहननगर येथील तिघांचे आणि पुण्यातील पण वायसीएममध्ये उपचार सुरु असलेल्या एक महिलेचे अशा चार जणांचे बुधवारी सायंकाळी रिपोर्ट पॉझिटीव्ह आले आहेत. तर सकाळी मोशी, पिंपळेगुरव, चिंचवड आणि पुण्यातील एक अशा आठ जणांचे रिपोर्ट पॉझिटीव्ह आले होते. त्यामुळे शहरात बुधवारी दिवसभरात 12 नवीन रुग्णांची भर पडली आहे.

बुधवारी पिंपरी चिंचवड शहरातील विविध पोलीस ठाण्यात भारतीय दंड विधान कलम 188 प्रमाणे एमआयडीसी भोसरी (17), भोसरी (24), पिंपरी (16), चिंचवड (44), निगडी (57), आळंदी (13), चाकण (2), दिघी (22), सांगवी (9), वाकड (20), हिंजवडी (56), देहूरोड (1), तळेगाव दाभाडे (13), तळेगाव एमआयडीसी (1), चिखली (22), रावेत चौकी (9) एकूण 326 जणांवर कारवाई केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.