Chinchwad : पिंपरी चिंचवड पोलिसांकडून आणखी 214 जणांवर कारवाई

एमपीसी न्यूज – पिंपरी चिंचवड पोलिसांनी गुरुवारी (दि. 7) 214 जणांवर कारवाई केली. लॉकडाऊनच्या कालावधीत प्रशासनाने दिलेल्या आदेशाचे पालन न केल्याबाबत ही कारवाई करण्यात आली आहे. लॉकडाऊन सुरू झाल्यापासून पोलिसांकडून ही कारवाई अविरत सुरू आहे. आजवर सात हजार पेक्षा अधिक जणांवर ही कारवाई करण्यात आली आहे.

4 मे पासून देशभरात लॉकडाऊन 3.0 ला सुरुवात झाली आहे. हा तिसऱ्या टप्प्यातील लॉकडाऊन दोन आठवड्यांसाठी (4 ते 17 मे) लागू करण्यात आला आहे. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लॉकडाऊन जाहीर करण्यात आला असून यात संचारबंदी आणि जमावबंदीचे आदेश देण्यात आले आहेत. राज्यात साथरोग प्रतिबंधक कायदा लागू करण्यात आला आहे. यानुसार नागरिकांच्या अत्यावश्यक कामाशिवाय फिरण्यावर बंधने आली आहेत.

पिंपरी चिंचवड शहरात अनेक भागात कंटेन्मेंट झोन (प्रतिबंधित क्षेत्र) तयार करण्यात आले आहेत. हे परिसर पूर्णतः सील करून लॉकडाऊनचे नियम कठोर करण्यात आले आहेत. अशी परिस्थिती असताना नागरिक अजूनही विनाकारण घराबाहेर फिरताना आढळून येत आहेत. ही बाब दररोज होणाऱ्या कारवाईच्या आकड्यावरून स्पष्ट होत आहे. पोलीस देखील न कंटाळता नियमभंग करणाऱ्यांवर कारवाई करीत आहेत. मागील दोन दिवसांच्या तुलनेत कारवाईचा ओघ काही प्रमाणात ओसरला आहे.

पिंपरी-चिंचवड शहरातील सक्रिय रुग्णांची संख्या 80 झाली आहे. तर, आजपर्यंत शहरातील आणि शहराबाहेरील पण वायसीएम रुग्णालयात उपचार सुरू आहेत अशा 167 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. तर, 65 जण कोरोनामुक्त झाले असून सात जणांचा मृत्यू झाला आहे. तर आज (शुक्रवारी) तळवडेतील ताम्हाणे वस्ती भागातील युवक, वृद्ध महिला आणि मोशीतील 33 वर्षीय महिला असे तिघांचे रिपोर्ट पॉझिटीव्ह आले आहेत.

गुरुवारी पिंपरी चिंचवड शहरातील विविध पोलीस ठाण्यात भारतीय दंड विधान कलम 188 प्रमाणे एमआयडीसी भोसरी (8), भोसरी (17), पिंपरी (11), चिंचवड (22), निगडी (18), आळंदी (12), चाकण (5), दिघी (6), सांगवी (10), वाकड (23), हिंजवडी (13), देहूरोड (36), तळेगाव दाभाडे (8), तळेगाव एमआयडीसी (2), चिखली (22), शिरगाव चौकी (1) एकूण 214 जणांवर कारवाई केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.