Chinchwad : उघड्यावर अंडाभुर्जी, चायनीज विकणा-यांवर पिंपरी-चिंचवड पोलिसांची कारवाई; 136 जणांवर गुन्हे दाखल

एमपीसी न्यूज – उघड्यावर अंडाभुर्जी, चायनीज आणि तत्सम पदार्थ विकणा-यांवर 6 ते 12 डिसेंबर 2019 या कालावधीत पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत 136 जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. तर, 563 जणांवर खटले भरवण्यात आले आहेत. 31 डिसेंबरच्या पार्श्वभूमीवर आणि वाढत्या गुन्ह्यांवर आळा घालण्यासाठी पोलीस आयुक्त संदीप बिष्णोई यांनी ही मोहीम हाती घेतली आहे.

पिंपरी-चिंचवड पोलिसांनी उघड्यावर अंडाभुर्जी, चायनीज आणि तत्सम पदार्थ विकणा-यांव कठोर कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. मागील आठवड्यापासून ही कारवाईची मोहीम सुरु केली आहे. सार्वजनिक ठिकाणी असभ्य वर्तन केल्याप्रकरणी मुंबई पोलीस कायदा कलम 112, 117 अन्वये भोसरी एमआयडीसी वगळता सर्व पोलीस ठाण्यात एकूण 366 जणांवर खटले दाखल करण्यात आले आहेत.

तर, सार्वजनिक वाहतूक व नागरिकांना अडथळा होईल अशी वाहने, हातगाडी लावल्याप्रकरणी मुंबई पोलीस कायदा कलम 102 अन्वये पिंपरी, दिघी आणि तळेगाव दाभाडे पोलिसांनी एकूण 17 खटले नोंदवले आहेत.

रात्री उशिरापर्यंत हातगाडी, अंडाभुर्जी, चायनीज स्टॉल सुरु ठेवणा-यांवर वेळेच्या मर्यादेचे पालन न केल्याप्रकरणी मुंबई पोलीस कायदा कलम 33 (क्ष) नुसार पिंपरी, भोसरी, भोसरी एमआयडीसी, चाकण, आळंदी, वाकड, हिंजवडी, देहूरोड आणि चिखली पोलिसांनी 180 खटले दाखल केले आहेत. त्याचबरोबर दारू पिऊन सार्वजनिक ठिकाणी गोंधळ करणा-यांवर वाकड, हिंजवडी, सांगवी, तळेगाव एमआयडीसी, चिखली पोलिसांनी 136 जणांवर गुन्हे दाखल केले आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.