Chinchwad : पिंपरी-चिंचवड पोलिसांची वेबसाईट लॉन्च (व्हिडिओ)

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाने आपली वेबसाईट (संकेतस्थळ) नागरिकांच्या सेवेत दाखल केली. पोलीस आयुक्त संदीप बिष्णोई यांच्या हस्ते बुधवारी (दि. 18) वेबसाईटचे लॉंचिंग करण्यात आले. www.pcpc.gov.in या वेबसाईटच्या माध्यमातून पिंपरी चिंचवड पोलीस नागरिकांपर्यंत पोहोचणार आहेत.

15 ऑगस्ट 2018 रोजी पिंपरी चिंचवड शहरासाठी स्वतंत्र पोलीस आयुक्तालय सुरू झाले. त्यानंतर आयुक्तालयाने विविध विभाग सुरू केले. त्याचबरोबर नागरिकांशी संवाद वाढविण्यासाठी 16 जुलै 2019 रोजी पिंपरी-चिंचवड पोलिसांनी ट्विटर अकाउंट सुरू केले. Pimpri Chinchwad Police असे ट्विटर अकाउंटच्या प्रोफाइलचे नाव आहे. तर @PCcityPolice या नावाने ट्विटर अकाऊंड सुरु करण्यात आले आहे.

यानंतर, पोलीस आयुक्तालयाची माहिती नागरिकांपर्यंत पोहोचावी. तसेच नागरिकांच्या समस्या, पोलिसांचे नवीन उपक्रम, गुन्हेगारांची माहिती यासाठी पिंपरी चिंचवड पोलिसांनी आपली स्वतंत्र वेबसाईट सुरू केली. वेबसाईटमुळे पोलिसांना आणखी सक्रियपणे नागरिकांशी संवाद साधता येणार आहे.

पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाची वेबसाईट मोबाईल, टॅब, आयपॅडवर देखील सहजपणे पाहता येणार आहे. या वेबसाईटमध्ये सायबर सुरक्षेवर भर देण्यात आला आहे. मराठी आणि इंग्रजी भाषेत असलेल्या या वेबसाईटवर ई-तक्रार, लॉस्ट अँड फाउंड, बेवारस वाहने, अनोळखी मृतदेह, पोलीस पडताळणी सेवा, भाडेकरूंची माहिती देता येणार आहे. त्याचबरोबर यामध्ये माहितीचा अधिकार, पोलीस भरती, पोलीस विभागाचे विविध उपक्रम, सुरक्षेबाबत दक्षता, शहरातील वाहतूक विषयक माहिती देखील देण्यात येणार आहे.

नव्या वेबसाईटवर पिंपरी-चिंचवड पोलीस दलातील अधिकारी, पोलीस ठाणे, विविध शाखा आणि त्यांचे अधिकारी व संपर्क क्रमांक देण्यात आले आहेत. अंध व्यक्तींना स्क्रीन रीडर सॉफ्टवेअरच्या सहाय्याने ही वेबसाईट हाताळता येईल. विविध प्रकारच्या परवानग्याचे अर्ज देखील वेबसाईटवर उपलब्ध करून देण्यात आले आहेत.

पोलीस आयुक्त संदीप बिष्णोई म्हणाले, “माहिती तंत्रज्ञानाच्या युगात प्रत्येकजण मोबाईल फोन आणि इंटरनेट वापरत आहे. नागरिकांची सुरक्षा केंद्रस्थानी ठेऊन पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाचे संकेतस्थळ सुरु करण्यात आले आहे. संकेतस्थळाच्या माध्यमातून नागरिकांना आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. नागरिकांनी पोलीस कामकाजासाठी या संकेतस्थळाचा वापर करावा.”

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.