Chinchwad : निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आयुक्तालयात भरारी पथकांसह निवडणूक सेलची स्थापना

एमपीसी न्यूज – पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय प्रथमच आगामी लोकसभा निवडणुकीला सामोरे जात आहे. त्यात आयुक्तालयाला अजूनही अनेक अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. अशात निवडणुकीच्या काळात शहरात कायदा आणि सुव्यवस्था कशी राखली जाणार याकडे सर्वांचे लक्ष आहे. पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तलयाच्या अखत्यारीत मावळ, शिरूर आणि बारामतीचा काही भाग अशा तीन लोकसभा मतदार संघांचा भाग येतो. त्यासाठी पोलीस आयुक्तालयात चार भरारी पथक आणि एक निवडणूक सेलची स्थापना करण्यात आली आहे. यामुळे निवडणूक तयारीच्या कामाला वेग आला आहे.

पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या हिंजवडी पोलीस ठाण्याच्या अखत्यारित असलेला काही भाग हा बारामती लोकसभा मतदार संघाला जोडण्यात आला आहे. तर पिंपरी ते तळेगाव हा परिसर मावळ आणि भोसरी, एमआयडीसी, दिघी, आळंदी, चाकण हा परिसर शिरूर लोकसभा मतदार संघात येतो. बारामती लोकसभेचे 23 एप्रिल तर शिरूर व मावळ लोकसभेचे 29 एप्रिलला मतदान होणार आहे.

_MPC_DIR_MPU_II

निवडणूक काळाच्या कामकाजासाठी सर्व पोलीस अधिकाऱ्यांच्या आणि कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द करण्यात आल्याचेही मंगळवारी (दि. 12) रात्री उशिरा जाहिर करण्यात आले आहे. न्यायालयीन काम आणि आजारपणाव्यतिरिक्त शक्यतो सुट्ट्या घेण्यात येऊ नयेत अशा स्पष्ट सूचना आयुक्तांनी सर्व घटप्रमुखांना दिल्या आहेत.

निवडणूक आयोगाच्या आदर्श आचारसंहितेनुसार पोलीस दलात काही कक्ष देखील नव्याने सुरू करण्यात आले आहेत. सहाय्यक पोलीस आयुक्त दर्जाच्या अधिकाऱ्याची नोडल ऑफिसर म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. तर उपायुक्तांच्या कार्यप्रकाराची देखील तात्पुरती विभागणी पोलीस आयुक्त आर के पद्मनाभन यांनी केली आहे.

फेब्रुवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यात निवडणूक सेल कार्यान्वित करण्यात आला होता. सोमवारी (दि. 11) या सेलसाठी स्वतंत्र कक्ष उपलब्ध करून देण्यात आला आहे. उपायुक्त विनायक ढाकणे यांच्या अखत्यारित याचे काम चालणार असून, या सेलला विशेष शाखेची जोड राहणार आहे. तसेच निवडणूक सेलसाठी सहाय्यक आयुक्त, एक वरिष्ठ निरीक्षक, चार अधिकारी व दहा कर्मचाऱ्यांची स्वतंत्रपणे नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच नागरिकांना कोणत्याही स्वरूपाची मदत हवी असल्यास तत्काळ ती पोहचली पाहिजे यासाठी सर्व वरिष्ठ निरीक्षकांनी जातीने लक्ष घालावे असेही बजाविण्यात आले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.