Chinchwad : पोलीस आयुक्तालयाला सीएसआर फंडातून मिळणार वाहने

एमपीसी न्यूज – अडचणींच्या भोवऱ्यात अडकलेल्या पोलीस आयुक्तालयाला अडचणींमधून मुक्त करण्याचे प्रयत्न सुरू असून वाहनांचा प्रश्न लवकरच मार्गी लागणार आहे. सीएसआर फंडातून पोलिसांना वाहने घेता येणार असून, त्याच्या मालकी हक्क आणि तांत्रिक अडचणींचा मार्ग मोकळा झाला आहे. पोलिसांकडून औद्योगिक पट्ट्यातील वाहन उद्योगांसह अन्य कंपन्यांना लवकरच यासाठी आवाहन करण्यात येणार आहे.

पुणे शहर आणि ग्रामीण पोलीस दलाचे विभाजन करून सुरू करण्यात आलेल्या पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाला अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. 15 ऑगस्ट पासून सुरू झालेल्या या आयुक्तालयातील मनुष्यबळाचा मुद्दा गाजत आहे. तसेच कार्यरत असलेल्या अधिकाऱ्यांना वाहने नाहीत. त्यामुळे गस्त घालणे, रात्रीच्या वेळी मदत पोहचविणे यामध्ये मर्यादा येत आहेत. मात्र सीएसआर फंडातून वाहने मिळाल्यास या समस्या सुटणार आहेत.

पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाला वाहने आणि मनुष्यबळ देताना वरिष्ठ अधिका-यांनी दुय्यम स्थान दिले आहे. पिंपरी-चिंचवड महापालिकेने पोलिसांना इमारत उपलब्ध करून दिली आहे. तसेच तेथील फर्निचर आणि कॉम्प्युटर देण्यासाठी अन्य पदाधिकाऱ्यांनी निधी उपलब्ध करून दिला. अतिरिक्त आयुक्तांसह, उपायुक्त, सहाय्यक आयुक्त तसेच पोलिस ठाण्यांमध्ये वाहनांची कमतरता आहे. अतिरिक्त आयुक्तांसह उपायुक्तांची वाहने कामचलावू आहेत. भर रस्त्यात वरिष्ठ अधिकाऱ्यांची वाहने बंद पडल्याच्या घटना अनेक वेळा घडल्या आहेत.

आयुक्त आर. के. पद्मनाभन आणि अतिरिक्त आयुक्त मकरंद रानडे यांनी वेळोवेळी यासाठी शासनाकडे पाठपुरावा केला होता. पण त्याला सकारात्मक प्रतिसाद मिळत नव्हता. पालकमंत्री गिरीश बापट तसेच खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर देखील हे गाऱ्हाणे या दोन्ही अधिकाऱ्यांनी मांडले होते. पोलीस आयुक्त आर के पद्मनाभन हे दोन दिवसांपूर्वी महासंचालक कार्यालयात शासकीय कामासाठी गेले होते. तेव्हा त्यांनी पुन्हा एकदा हा मुद्दा महासंचालकांसह संबंधित अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिला. त्यानंतर सीएसआर फंडातून वाहने खरेदी करणे, त्याची मालकी हक्क पोलीस दलाकडे असणे आणि त्याच्या इंधनाबाबत पोलीस स्तरावर निर्णय घेण्यास अधिकाऱ्यांनी सहमती दर्शविली आहे. त्यामुळे येत्या काळात सीएसआर फंडातून वाहने उपलब्ध झाल्यास गस्त आणि कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निकाली काढण्यास मदत होणार आहे.

पोलीस आयुक्त आर के पद्मनाभन म्हणाले, “सीएसआर फंडातून वाहने घेतल्यास त्याच्या मालकी आणि इंधनाबाबतचा प्रश्न उभा राहत होता. हा तांत्रिक मुद्दा असला तरी त्याबाबत निर्णय प्रलंबित होता. त्यामुळे शासनाकडे याबाबत पाठपुरावा केला होता. आता सीएसआरमधून वाहने खरेदी केल्यावर त्याच्या मालकी हक्कासह अन्य बाबींचा निपटारा होईल. त्यामुळे लवकर सीएसआर फंड उभा करण्याचे काम आम्ही सुरू करत आहोत”

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.