Chinchwad : कवी कवितेतून उत्तम प्रबोधन करु शकतो – महादेव कवितके

एमपीसी न्यूज – कवी आपल्या कवितेतून उत्तम प्रबोधन करू शकतो, असे मत उद्योजक महादेव कवितके यांनी चिंचवड येथे व्यक्त केले. चिंचवड येथील साई मंदिर प्रांगणात पिंपरी-चिंचवड व्याख्यानमाला समन्वय समिती अंतर्गत तीन दिवसीय सुबोध व्याख्यानमालेत पिंपरी-चिंचवड साहित्य मंच आयोजित राष्ट्रजागर कविसंमेलनात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी गुणवंत कामगार अनिल गायकवाड होते.

राष्ट्रजागर कविसंमेलनात तावडी-वऱ्हाडी बोलीत पीतांबर लोहार यांनी “चाल चाल माय तू मतदानले…” या शब्दांत काव्यमय आवाहन करीत लोकशाहीतील मतदान प्रक्रियेवर त्यांनी भाष्य केले. जयश्री कुलकर्णी यांनी ‘आई’ या कवितेतून आईची महती सांगितली. दिगंबर शिंदे यांनी “भ्रष्टाचार हा झाला शिष्टाचार… एक ना धड चिंध्या भारंभार!” या शब्दांतून लोकशाहीची शोकांतिका मांडली. ऊर्मिला भुंजे यांनी ‘लाडक्या’ हे विडंबन सादर केले.

  • निलेश म्हसाये यांनी ‘रायगड’ या काव्यातून संपूर्ण रायगडाचे चित्र रसिकांपुढे साकार केले. मधुश्री ओव्हाळ यांनी ‘महान देशाची करुण कहाणी’ ही उपहासिका मांडली. अशोक कोठारी यांनी, “मी मलाच शोधत आहे विराण वाटेवरती…” ही गझल अतिशय आर्तपणे सादर करून दाद मिळवली. सविता इंगळे यांच्या ‘शहीद’ या रचनेमुळे श्रोते सद्गदीत झाले; तर सुरेश कंक यांच्या, “शूर चापेकर बंधू गेले देशासाठी फाशी… मरुनी जगावं, जगुनी उरावं दाविलं भारतीयांशी!”

या गीतातून वीर चापेकर बंधूंचे देशासाठी केलेले हौतात्म्य श्रोत्यांना अंतर्मुख करून गेले. कैलास भैरट यांनी आपल्या कवितेतून मतदारांना आवाहन केले. प्रा. तुकाराम पाटील यांची ‘राजकारणात वावरताना…’ ही मुक्तछंदातील कविता आणि राज अहेरराव यांची गझल रसिकांना विशेष भावली.

  • राजेंद्र घावटे यांनी,”थोर आम्ही मतदार आम्हाशी काय शिकावी नीती…” हे विडंबन गीत सादर केले. दिनेश भोसले, प्रदीप गांधलीकर, रामसिंह परदेशी, विलास रूपटक्के, उमा कुलकर्णी, कैलास गवळी, मेधा देसाई, यांच्या कविता उल्लेखनीय होत्या. विविध संदर्भ, काव्यपंक्ती, शेरोशायरी उद्धृत करीत राजेंद्र घावटे यांनी बहारदार सूत्रसंचालन केले. सुभाष पागळे, शंकर काळभोर, गणेश पागळे यांनी कार्यक्रमाच्या संयोजनात परिश्रम घेतले. प्रभाकर ढोमसे यांनी आभार मानले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.