Chinchwad : सामान्याला असामान्य रूप देते ती कथा -प्रा. तुकाराम पाटील

एमपीसी न्यूज – कथा सर्वसामान्याच्या जीवनाला सोनेरी मुलामा देण्याचे कार्य करते. तेवढ्याच ताकदीच्या लेखनाला तेवढ्याच ताकदीने वाचन असले की कथा रसिकांना मंत्रमुग्ध करते. सामान्याला असामान्य रूप देते ती कथा, असे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक प्रा. तुकाराम पाटील यांनी केले.

चिंचवड येथे पैस रंगमंच, थिएटर वर्कशॉप कंपनी आणि नवयुग साहित्य व शैक्षणिक मंडळ आयोजित वाचन श्रवणाद्वारे मराठी राजभाषा संवर्धनाच्या दृष्टीने कथा अभिवाचन हा उपक्रम राबवण्यात आला होता. त्यात प्रमुख पाहुणे म्हणून प्रा. पाटील बोलत होते. ज्येष्ठ साहित्यिक राज अहेरराव लिखित “ऋणानुबंध’ या कथेचे राज अहेरराव व अश्विनी कुलकर्णी यांनी अतिशय मनोवेधक पद्धतीने अभिवाचन केले. या वेळी व्याख्याते राजेंद्र घावटे, नंदकुमार कांबळे नितीन हिरवे, भाग्येश अवधानी, नंदकुमार मुरडे, अशोक कोठारी, उज्ज्वला केळकर, रजनी अहेरराव, माधुरी ओक, प्रभाकर पवार, जयश्री घावटे, शरद काणेकर आदी उपस्थित होते.

नंदकुमार कांबळे म्हणाले, “ऋणानुबंध कथा ऐकतांना चित्रपट बघण्याचा भास झाला. याचे प्रयोग महाराष्ट्र भर व्हावे अशी इच्छा आहे.’ नितीन हिरवे म्हणाले, “ही कथा लेखकाची राहिली नसून, समाजाच्या प्रत्येक व्यक्तीचे जीवन यात गुंफले आहे त्यामुळे ही कथा प्रत्येकाची कथा झाली आहे. राजेंद्र घावटे म्हणाले, मानवी जीवन अनेक भाव भावनांनी भरलेले असते. अशा वेळी अखेरी पती पत्नी एकमेकांच्या भावनेत एकरूप होतात. “ऋणानुबंध’ ही कथा आयुष्याच्या प्रत्येक टप्प्याचे मार्मिक विश्लेषण आहे. भाग्येश अवधानी यांनीही मनोगत व्यक्त केले. माधुरी ओक यांनी आभार मानले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.