Chinchwad : सरकारी आदेशानंतरही जीवनावश्यक वस्तू वगळता इतर दुकाने सुरूच; आणखी 15 दुकानदारांवर कारवाई

एमपीसी न्यूज – कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी केंद्र, राज्य आणि जिल्हा पातळीवरून कसोशीने प्रयत्न केले जात आहेत. जीवनावश्यक वस्तूंची दुकाने वगळून इतर सर्व दुकाने आणि आस्थापना बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी दिले आहेत. तरी देखील काही दुकानदार सरकारी आदेशाला तिलांजली देऊन आपली दुकाने सुरू ठेवत आहेत. त्यांच्यावर पोलीस कारवाई करीत आहेत. सरकारी आदेशाला न जुमानणा-या दुकानदारांवर आणखी कठोर कारवाईची पावले उचलायला हवीत.

सोमवारी (दि. 23) पिंपरी, भोसरी, वाकड, सांगवी, चिखली, देहूरोड येथील एकूण 15 दुकानदारांवर कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईमुळे मागील पाच दिवसात केलेल्या कारवाईचा आकडा 259 वर पोहोचला आहे.

13 मार्च 2020 पासून राज्यात साथरोग प्रतिबंधात्मक कायदा 1897 लागू करण्यात आला आहे. राज्यातील सर्व महापालिका, नगरपालिका, नगर पंचायतीच्या क्षेत्रातील सर्व शॉपिंग मॉल, दुकाने, आस्थापना, चित्रपटगृहे, जलतरण तलाव, व्यायाम शाळा, नाट्यगृहे, आंगणवाड्या, शाळा, महाविद्यालये बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय, क्रीडा विषयक कार्यक्रमांना पुढील आदेशापर्यंत परवानगी देण्यात येऊ नये. तसेच यापूर्वी दिलेल्या परवानग्या रद्द कराव्यात, असेही आदेशात म्हटले आहे.

एका ठिकाणी होणारी गर्दी टाळण्यासाठी सर्व शॉपिंग मॉल, दुकाने, आस्थापना पुढील आदेशापर्यंत बंद राहतील. अत्यावश्यक किराणा सामान, दूध, भाजीपाला, औषधे आणि अन्य जीवनावश्यक वस्तूंची दुकाने वगळण्यात आली आहेत. मात्र, जिलाधिका-यांच्या आदेशाकडे कानाडोळा करून काही दुकानदार दुकाने सुरूच ठेवत आहेत. त्या दुकानदारांना समजावण्यासाठी पोलीस रस्त्यावर उतरले आहेत. समज देऊनही दुकाने सुरु ठेवल्यास पोलिसांकडून संबंधित दुकानदारांवर भारतीय दंड विधान कलम 188 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात येत आहेत.

गुरुवारी (दि. 19) 129, शुक्रवारी (दि. 20) 80, शनिवारी (दि. 21) 29, रविवारी (दि. 22) 6, सोमवारी (दि. 23) 15 दुकांदारांवर कारवाई करण्यात आली आहे. अनेक दुकानदार समोरचे गेट बंद करून मागच्या दाराने आपले व्यवहार सुरू ठेवतात. अशा दुकांदारांवर देखील कारवाई केली जात आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.