Chinchwad : जामिनावर सुटलेल्या आरोपीला शक्तिप्रदर्शन पडले महागात; पोलिसांनी केली पुन्हा अटक

एमपीसी न्यूज – चिंचवड येथील खून प्रकरणातील मुख्य आरोपीने जामिनावर सुटताच चिंचवड येथील वेताळनगर परिसरात जोरदार शक्तिप्रदर्शन करीत दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला. या हुल्लडबाजीचा व्हिडीओ ‘सोशल मीडिया’वर ‘व्हायरल’ झाल्याने पोलीस यंत्रणा सतर्क झाली. पोलिसांनी त्यास पुन्हा अटक करीत त्याच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई केली आहे. तसेच तो आरोपी वाकडच्या दोन गुन्ह्यात फरार असल्याने त्यास वाकड पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

रणजीत उर्फ रंज्या बापू चव्हाण (वय 23, रा. वेताळनगर झोपडपट्टी चिंचवड ) असे अटक करण्यात आलेल्या सराईत गुन्हेगाराचे नाव आहे. त्याच्यावर चिंचवड, निगडी, वाकड, वडगाव मावळ या ठिकाणी एकूण 16 गंभीर गुन्ह्यांची नोंद आहे.

चव्हाण याने साथीदारांच्या मदतीने आकाश उर्फ रायबा तानाजी लांडगे (वय 24, रा. पागेची तालीम, चिंचवड) या तरुणाची 29 मे 2018 रोजी निर्घृण हत्या केली होती. आकाशच्या खुनानंतर चव्हाण तब्बल तीन महिने पोलिसांना गुंगारा देत होता. अखेर चिंचवड पोलिसांच्या तपास पथकाने त्याला भूम येथे सापळा रचून अटक केली.

त्यानंतर त्याची सोमवारी (दि. 21) जामिनावर सुटका झाली. सुटका होताच चव्हाणने वेताळनगर परिसरात शंभर ते दीडशे टवाळांमध्ये स्वतःची मिरवणूक काढली. ‘त्या’ मिरवणुकीचा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला. पोलीस आयुक्त आर. के. पद्मनाभन यांनी या व्हिडीओची गंभीर दखल घेत अधिकाऱ्यांना कारवाईच्या सूचना दिल्या. त्यानुसार चिंचवड पोलिसांच्या तपास पथकाने त्यास ताब्यात घेऊन प्रतिबंधात्मक कारवाई केली.

तसेच तो वाकड पोलीस ठाण्यात सन 2017 मध्ये दाखल असलेल्या जबरी चोरी आणि दंगलच्या गुन्ह्यात फरार असल्याने त्यास वाकड पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. वाकड पोलिसांनी चव्हाणला बुधवारी (दि. 30) न्यायालयासमोर हजर केले असता त्यास दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आल्याचे पोलीस उपनिरिक्षक हरीश माने यांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.