Chinchawad : सराईत मोबाईल स्नॅचर गजाआड (व्हिडिओ)

10 लाखाचे 110 मोबाईल जप्त

एमपीसी न्यूज – रस्त्यावरुन मोबाईलवर बोलत जाणा-यांच्या हातातील मोबाईल मोटार सायकल वरून हिसकावून चोरुन नेणा-या चोरट्यांना चिंचवड पोलिसांनी बेड्या ठोकल्या. त्यांच्याकडून तब्बल 10 लाख 62 हजार किंमतीचे 110 मोबाईल जप्त करण्यात आले आहे.

लखन उर्फ बबल्या अवधूत शर्मा (वय 18, रा. दळवीनगर झोपडपट्टी, चिंचवड) व लहू उर्फ लाल्या अंकुश भिसे (वय 18, रा. दळवीनगर झोपड, चिंचवड) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तपास पथकातील पोलीस कर्मचारी मिलिंद डोके यांना खब-याकडून चिंचवडमधील बिजलीनगर येथे दुचाकीवरून मोबाईल स्नाचिंग करणारे दोघेजण पांढरकरचाळ दळवीनगर येथे फिरत आहेत, अशी माहिती मिळाली होती.

मिळालेल्या माहितीनुसार, पोलिसांनी सापळा रचून त्या दोन चोरट्यांना ताब्यात घेतले व त्यांच्याकडे बिजलीनगर येथील मोबाईल स्नाचिंगची चौकशी केली असता त्यांनी गेल्या महिन्यात (दि.20 सप्टेंबर) एका अल्पवयीन मुलासोबत बिजलीनगर येथे एका पादचारी व्यक्तीचा मोबाईल ओढून चोरी केल्याचे कबूल केले.

पोलिसांनी त्यांची पोलीस स्टेशनमध्ये नेऊन सखोल चौकशी केली असता त्यांनी पिंपरी-चिंचवड परिसरातून चोरी केलेले 10 लाख 62 हजार रुपये किमतीचे तब्बल 110 मोबाईल जप्त केले. तसेच त्यांनी चोरीसाठी वापरलेल्या दोन दुचाकी जप्त केल्या आहेत. चिंचवड पोलिसांनी ही कामगिरी केली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.