Chinchwad News : ‘पोलिसांना गृहमंत्र्यांचे 100 कोटींचे टार्गेट’ प्रकरणावर पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश म्हणाले….

एमपीसी न्यूज – गृहमंत्र्यांनी पोलिसांना 100 कोटींच्या वसुलीचे टार्गेट दिल्याचा गौप्यस्फोट मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी लेटरबॉम्बद्वारे केला. त्यावरून सध्या राज्यासह देशभर याबाबत चर्चा रंगली आहे. पोलिसांना दिलेल्या टार्गेटबाबत पिंपरी चिंचवडचे पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांना विचारले असता आयुक्त म्हणाले, ‘पिंपरी चिंचवड शहर भयमुक्‍त करणे, हेच आमचे टार्गेट आहे.’

पोलिसांनी केलेल्या चांगल्या कामगिरीबाबत पोलीस आयुक्त कार्यालयात सोमवारी (दि. 22) पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. त्यानंतर राज्यात सुरू असलेल्या ‘गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सहायक निरीक्षक सचिन वाजे यांना दरमहा 100 कोटींचे टार्गेट दिले होते’ या चर्चेबाबत, तुमचे टार्गेट काय असे आयुक्तांना विचारले.

त्यावर आयुक्त म्हणाले, ‘पिंपरी चिंचवड शहर भयमुक्‍त करणे, हेच माझे टार्गेट आहे. शहरात कोणाचीही दादागिरी पोलीस खपवून घेणार नाहीत. गुन्हेगार हा कोणत्याही पक्षाचा असला तरी आमचा त्याच्याशी संबंध नाही. कारण तो आमच्यासाठी फक्‍त गुन्हेगार असतो.

आयुक्त पुढे म्हणाले, चुकीचे कामे करणाऱ्या व्यक्‍तींना अशा प्रकारची टार्गेट दिली जातात. आणि सहायक निरीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्याला पोलीस आयुक्‍ताच्या परवागीशिवाय असे टार्गेट दिले जाऊ शकत नाही, असे माझे वैयक्‍तिक मत आहे. त्यामुळे 100 कोटींच्या टार्गेटबाबतच्या आरोपात मला तथ्य वाटत नाही, असे म्हणत त्यांनी एकप्रकारे गृहमंत्र्यांची अप्रत्यक्षपणे पाठराखण केली.

पिंपरी चिंचवड शहरातील अवैध धंद्यातून वसूलीबाबतचे पत्र व्हायरल झाले होते. मात्र त्याचा तपास माझ्याकडे नसल्याने मी त्यावर भाष्य करणार नाही, असेही कृष्ण प्रकाश यांनी स्पष्ट केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.