Chinchwad : वाढत्या एटीएम चोरीची पोलीस आयुक्तांकडून गांभीर्याने दखल; एटीएम गुन्ह्यांच्या तपासासाठी ‘एसआयटी’ची स्थापना

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत एटीएम चोरीच्या गुन्ह्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. देहूरोड, चिखली आणि चाकण परिसरात सर्वाधिक घटना घडत आहेत. एटीएम चोरीच्या घटनांची पोलीस आयुक्त संदीप बिष्णोई यांनी गांभीर्याने दखल घेतली आहे. या गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयात ‘विशेष तपास पथका’ची (एसआयटी) स्थापना करण्यात आली आहे.

गेल्या महिनाभरात एटीएम चोरट्यांनी शहरात धुमाकूळ घातला आहे. महिनाभरात एटीएमबाबतच्या जवळपास दहा घटना घडल्या आहेत. पिंपरी-चिंचवड शहरात गॅस कटरने एटीएम कापून तसेच एटीएम खेचून नेण्याच्या घटना घडल्या आहेत. त्यापैकी चिखली येथील एटीएममध्ये चोरीचा प्रयत्न करणाऱ्या तीन स्थानिक आरोपींना पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. मशीन पळवून नेणा-या आरोपींचा शोध घेण्यात पोलिसांना यश आलेले नाही.

चाकण येथे एटीएम मशिन खेचून नेण्याच्या घटनेची पोलीस आयुक्त संदीप बिष्णोई यांनी गांभीर्याने दखल घेतली. रविवार असूनही गुन्हे शाखेच्या सर्व अधिकाऱ्यांची बैठक चाकण येथे घेण्यात आली. यापूर्वी केलेल्या तपासणीमध्ये आरोपी ग्रामीण भागाच्या दिशेने पळून जाताना दिसून आले आहेत. यामुळे रविवारी आयुक्‍त संदीप बिष्णाई यांनी बोलविलेल्या बैठकीस ग्रामीण पोलिसांचे स्थानिक गुन्हे शाखेचे अधिकारी तसेच खेड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षकही उपस्थित होते.

_MPC_DIR_MPU_II

शहरात आजवर घडलेल्या एटीएम चोरीच्या घटनांचा तपास करण्यासाठी गुन्हे शाखा युनिट एकचे पोलीस निरीक्षक उत्तम तांगडे यांच्या नेतृत्वाखाली विशेष तपास पथकाची स्थापना करण्यात आली आहे. शहराच्या विविध भागातील तपासात निपुण असलेल्या अधिकाऱ्यांना त्यांच्या जोडीला देण्यात आले आहे. हे पथक एटीएम चोरीच्या गुन्ह्यांचा तपास पोलीस ठाण्यांच्या बरोबरीने करणार आहे. वाढत्या एटीएम चोरीच्या घटना रोखण्यासाठी पोलिसांची गस्त वाढविणे, एटीएम सेंटरची तपासणी करणे, शहराबाहेर जाणाऱ्या रस्त्यांची नाकाबंदी करण्याच्या सूचना पोलीस आयुक्तांनी दिल्या आहेत.

रविवारी पहाटे चाकण येथे झालेल्या एटीएम चोरीच्या गुन्ह्याचा तपास करताना पोलिसांना एक स्कॉर्पिओ कार आढळून आली. या क्रमांकाच्या स्कॉर्पिओ मालकाला पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यांची कसून चौकशी केली. मात्र, चोरट्यांनी ‘त्या’ गुन्ह्यामध्ये स्कॉर्पिओ कारची नंबर प्लेट बनावट वापरल्याचे दिसून आले आहे.

शहराबाहेर जाणा-या आठ रस्त्यांवर नाकाबंदी
पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीतून बाहेर जाणाऱ्या आठ मार्गांवर पिंपरी-चिंचवड पोलिसांकडून कडेकोट नाकाबंदी केली जाणार आहे. चाकण-साबळेवाडी रोड, चाकण-शिक्रापूर रोड, सोमाटणे टोल नाका, उर्से टोल नाका, खेड टोलनाका, मुकाई चौक, बापूजीबुवा खिंड, बावधन पोलीस चौकी समोर, नाकाबंदीचे पॉईन्ट नियुक्‍त केले आहेत. याशिवाय इतर काही ठिकाणी अचानक नाकाबंदी केली जाणार आहे. रात्रीच्या वेळी केल्या जाणाऱ्या या नाकाबंदीत एक अधिकारी व तीन कर्मचारी असणार आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

_MPC_POSTEND_MAT_1