Chinchwad News : पोलीस आयुक्त सर्वसामान्यांना भेटण्यासाठी सहज उपलब्ध व्हावेत :  प्रदीप नाईक

  विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी 

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवडचे पोलीस आयुक्त सर्वसामान्यांना भेटण्यासाठी सहज उपलब्ध होत नाहीत त्यामुळे   नागरिकांचा भ्रमनिरास होत आहे. पोलीस आयुक्त सर्वसामान्य नागरिकांना भेटण्यासाठी सहज उपलब्ध व्हावेत, अशी मागणी माहिती अधिकार कार्यकर्ते प्रदीप नाईक यांनी केली आहे. याबाबतचे निवेदन नाईक यांनी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांना दिले आहे.

 

नाईक यांनी दरेकर यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, सध्या सर्व सामान्य माणसांना न्याय मिळणे दुरापास्त झाले आहे. गरीबांना कुणी वाली उरला नसल्याची परिस्थिती सध्या पहायला मिळत आहे. पोलीस चौकीत अथवा पोलीस ठाण्यात सर्वसामान्य नागरिक तक्रार नोंदविण्यासाठी जातो तेंव्हा त्याला चांगला अनुभव येत नाही.

_MPC_DIR_MPU_II

पोलिसांकडून नागरिकांना उडवा उडवीची उत्तरे दिली जातात. त्यामुळे नागरिक पोलीस आयुक्तालयात जातो. पण तिथे देखील यापेक्षा वेगळी परिस्थिती नसते. तेथील दारावरील शिपाई नागरिकांना अडवतात. काय काम आहे? आयुक्त मिटींगमध्ये आहेत. उद्या या. असे सांगून कर्मचा-यांकडून आयुक्तांची भेट होऊ दिली जात नाही.

लोकशाहीमध्ये सर्व सामान्य माणसाची ही अवहेलना कशापायी? आपण जनतेचे सेवक आहोत. जनतेची कामे विनामूल्य करून देणे आपले कर्तव्य आहे. जनतेच्या प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी आपण बांधील आहोत. याचा या शासकीय नोकरांना सोयीस्कररित्या विसर पडलेला दिसतो.

आयुक्तांना भेटण्याची वेळ दुपारी चार ते सायंकाळी सहा ठेवण्यात आली आहे. स्थानिक पोलिसांकडून समाधान न झाल्यास नागरिकांनी थेट आयुक्तांशी संपर्क साधावा. अशा स्वरूपाच्या पाट्या आयुक्तालयात लावल्या आहेत. त्या ताबडतोब काढून टाकाव्यात. ‘पोलीस जनतेचा मित्र’ असे म्हणणे वेगळे आणि जनतेमध्ये मिसळून आपण देखील तुमच्यातीलच आहोत, असे कृतीतून दाखवून देणे वेगळे आहे. असेही नाईक यांच्या निवेदनात म्हटले आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.