Chinchwad : फ्ल्यू सदृश लक्षणे असणाऱ्या पोलिसांची आयुक्तालयाकडून तपासणी; आवश्यकता भासल्यास कोरोनाचीही चाचणी होणार

एमपीसी न्यूज – समाजाच्या सर्व स्तरांशी संपर्क असलेल्या पोलिसांना कोरोना संसर्गाचा धोका अधिक आहे. पोलीस प्रशासन शक्य तेवढी काळजी घेत असून धोक्याची पातळी दिवसेंदिवस वाढत आहे. त्यात पुण्यातील तीन पोलिसांना कोरोनाची बाधा झाल्याचे समोर आले आहे. त्यामुळे पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाकडून सर्दी, ताप, खोकला अशी फ्ल्यू सदृश लक्षणे असलेल्या पोलिसांची आरोग्य तपासणी केली जाणार आहे. डॉक्टरांच्या सल्ल्याने संबंधित पोलिसांची कोरोनाची देखील चाचणी केली जाणार आहे.

सहाय्यक पोलीस आयुक्त श्रीधर जाधव यांनी याबाबत माहिती दिली. पोलीस आयुक्त संदीप बिष्णोई यांच्या संकल्पनेतून पिंपरी चिंचवड शहरातील पोलीस अधिकारी आणि कर्मचारी यांच्यापैकी कोणाला सर्दी, ताप, खोकला अशी लक्षणे असल्यास त्यांच्या तपासणीची व्यवस्था वाकड येथील आदित्य बिर्ला हॉस्पिटल येथे करण्यात आली आहे. तपासणीसाठी रुग्णालयात स्वतंत्र विभाग करण्यात आला आहे. सकाळी साडेदहा ते दुपारी अडीच या कालावधीत ही तपासणी केली जाईल.

डॉ. संदीप सिंग, डॉ. आशुतोष श्रीवास्तव हे डॉक्टर तपासणी करणार आहेत. प्राथमिक तपासणी केल्यानंतर आवश्यकता भासल्यास डॉक्टरांच्या शिफारशीनंतर संबंधित पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांची कोरोनाची चाचणी केली जाणार आहे. ज्या पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्याची कोरोनाची चाचणी केली जाईल, त्यांना डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार रुग्णालयात अथवा घरी क्वारंटाईन राहावे लागणार आहे. कोरोना चाचणी पोलिसांसाठी मोफत असून याचा खर्च पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालायकडून केला जाणार आहे.

पोलीस प्रत्यक्ष रस्त्यावर उतरून काम करतात. कोरोनाच्या संकटात देखील समाजातील सर्व प्रकारच्या लोकांशी पोलिसांचा संपर्क येतो. ड्युटी संपल्यानंतर घरी कितीही काळजी घेतली तरी घरातील व्यक्तींशी संपर्क होण्याची शक्यता नाकारता येत नाही. वाकड येथील पोलीस वसाहतीत राहणाऱ्या एका पोलिसाला कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. प्रशासनाने तात्काळ खबरदारी घेत वसाहतीमधील एक इमारत सील केली आहे. समाजाची अहोरात्र सुरक्षा करणारा घटक सुरक्षित राहायला हवा. त्यामुळे पोलीस, त्यांचे कुटुंबीय सुरक्षित राहावेत यासाठी पोलीस आयुक्तालायकडून हा उपक्रम राबविण्यात येत आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.