Chinchwad : पोलीस आयुक्तांचा दरबार; कर्मचा-यांना चॉईस पोस्टिंग

केवळ दोन तासांत सुमारे 600 पोलीस कर्मचा-यांच्या अंतर्गत बदल्या

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाचे पोलीस आयुक्त आर. के. पद्मनाभन यांनी आज (मंगळवारी) पोलीस आयुक्तालयात दरबार घेतला. यामध्ये त्यांनी पोलीस कर्मचा-यांना त्यांच्या चॉईसनुसार पोस्टिंग दिले. या अनोख्या बदली पद्धतीमुळे पोलीस खात्यातील पारदर्शकता सर्वांसमोर आली आहे. केवळ दोन तासांच्या दरबारात त्यांनी सुमारे 600 पोलीस कर्मचा-यांच्या अंतर्गत बदल्या केल्या.

पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयात नवीन पोलीस चौक्यांची निर्मिती करण्यात आली आहे. त्याचबरोबर गुन्हे शाखेची तीन युनिट नव्याने तयार केली आहेत. त्यामुळे या चौक्यांसह गुन्हे शाखेला कर्मचा-यांची आवश्यकता होती. काही पोलीस ठाण्यांमध्ये देखील कर्मचा-यांची आवश्यकता आहे. त्यात मागील तीन महिन्यांपासून पोलीस आयुक्त आर. के. पद्मनाभन यांच्याकडे अंतर्गत बदलीसाठी अनेक अर्ज येत होते. त्यामुळे त्यांनी बदल्यांसाठी इच्छुक असणा-या सर्व पोलीस कर्मचा-यांचा दरबार भरवून बदल्या करून दिल्या.

  • पोलीस खात्यात बदल्यांसाठी बड्या हस्तींचा संपर्क आणि आर्थिक ताकद महत्वाची आहे, अशी चर्चा वारंवार होते. यामुळे इमानदारीने काम करणारे कर्मचारी दडपणाखाली राहतात. त्यावर तोडगा काढत पोलीस आयुक्तांनी मैदानावर बोलावून सर्वांच्या समक्ष बदल्या केल्या. यामुळे कर्मचा-यांमध्ये हुरूप आला आहे. इच्छेप्रमाणे बदल्या केल्या असून आता कामात कसूर करायचा नाही, असा सल्ला देखील आयुक्तांनी सर्व कर्मचा-यांना दिला आहे.

एकाच पोलीस ठाण्यात अनेक वर्ष काम केल्याने कर्मचा-यांनी आपले गड स्थापन केले होते. हे गड पाडण्यासाठी आजवर एखाद्या पोलीस ठाण्यात तीन किंवा त्यापेक्षा अधिक वर्ष सेवा केलेल्या कर्मचा-यांची थेट नियंत्रण कक्षात अथवा दुस-या पोलीस ठाण्यात बदली करण्यात आली आहे. गुन्हे शाखेला काम केलेल्या कर्मचा-यांना पुन्हा गुन्हे शाखेत काम मिळणार नाही. त्यामुळे नव्या चेह-यांना गुन्हे शाखेत काम करण्याची संधी मिळणार आहे.

  • पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालय तयार होताना तळेगाव, तळेगाव एमआयडीसी, चाकण, आळंदी या पोलीस ठाण्यांचा आयुक्तालयात समावेश करण्यात आला होता. या पोलीस ठाण्यातील वरिष्ठ अधिकारी अनेकदा बदलले मात्र, कर्मचारी तिथेच ठाण मांडून बसले होते. ग्रामीणमधील काही कर्मचारी शहरात काम करण्यास तयार नव्हते. त्यामुळे अशा कर्मचा-यांची देखील शहरातील पोलीस ठाण्यात बदली करण्यात आली आहे.

एखाद्या पोलीस ठाण्यात काम करण्यासाठी अनेक कर्मचारी पसंती देतात. परंतु त्या पोलीस ठाण्यात तेवढी आवश्यकता नसते. कर्मचारी संख्येची गरज पूर्ण झाल्यानंतर उरलेल्या कर्मचा-यांना तिथे बदली मिळत नाही. त्यामुळे काही कर्मचारी नाराज होतात. अशा नाराज होणा-या कर्मचा-यांच्या दुखण्यावर इलाज म्हणून कर्मचा-यांमधीलच काही कर्मचा-यांना इच्छुक कर्मचा-यांच्या बदल्यांची प्रक्रिया करण्यास सांगितले. यातून कर्मचा-यांना देखील प्रशासकीय कामाचा अनुभव आला. एकाच पोलीस ठाण्यात सर्वांना बदली मिळणार नाही, याची जाणीव त्यांच्यामध्ये निर्माण झाल्याने नाराजी कमी झाली.

  • डिफॉल्ट कर्मचा-यांना बदली नाही
    एखाद्या पोलीस ठाण्यात तीन किंवा त्यापेक्षा अधिक वर्ष सेवा केली आहे. तसेच एखाद्या कर्मचा-याविषयीचा त्या पोलीस ठाण्यातील अनुभव चांगला नाही. तसेच अन्य प्रशासकीय कारणांमुळे कर्मचारी डिफॉल्ट असेल तर अशा डिफॉल्ट कर्मचा-यांची वरिष्ठ अधिका-यांकडून चौकशी करून त्याबाबत अहवाल मागवण्यात येणार आहे. त्या अहवालानुसार संबंधित इच्छुक कर्मचा-याला पोलीस देण्यात येणार आहे. संबंधित कर्मचा-याविषयी वरिष्ठांचा अहवाल निराशाजनक असेल तर त्या कर्मचा-यांना पोलीस आयुक्तालयात अथवा नियंत्रण कक्षाला जोडण्यात येणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.