Chinchwad : महिला सुरक्षेसाठी पोलीस आयुक्तालयाच्या उपाययोजना केवळ कागदावरच – प्रदीप नाईक

एमपीसी न्यूज – महिला सुरक्षेसाठी पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाकडून विविध उपाययोजना करण्यात येत असल्याचे सांगण्यात आले आहे. माहिती अधिकार कार्यकर्ते प्रदीप नाईक यांना दिलेल्या पत्रात पोलिसांनी याबाबत माहिती दिली आहे. या उपाययोजना केवळ कागदावर असून त्याची प्रत्यक्षात अंमलबजावणी होत नसल्याचा आरोप भ्रष्टाचार निर्मूलन समितीचे जिल्हाध्यक्ष व माहिती अधिकार कार्यकर्ते प्रदीप नाईक यांनी केला.

प्रदीप नाईक यांनी पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत महिला सुरक्षेसाठी योग्य उपाययोजना राबवाव्यात असे पोलीस महासंचालक कार्यालयाला निवेदन दिले होते. ते निवेदन महासंचालक कार्यालयाकडून पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालायकडे पाठवण्यात आले. त्यावर पिंपरी चिंचवड पोलिसांकडून नाईक यांना समजपत्र देण्यात आले. त्यात पोलिसांनी महिलांच्या सुरक्षेसाठी राबविण्यात येत असलेल्या विविध उपाययोजनांविषयी माहिती दिली.

महिला सुरक्षेसाठी बडी कॉप (पोलीस मित्र)च्या माध्यमातून पोलीस 24×7 उपलब्ध आहेत. आयुक्तालयाच्या हद्दीत बडी कॉपच्या माध्यमातून 243 व्हाट्सअप ग्रुप तयार केले आहेत. त्यामध्ये 84 पोलीस अधिकारी आणि कर्मचारी आहेत. या ग्रुपमध्ये शहरातील 14 हजार 583 महिला सदस्य आहेत. महिलांसाठी 1091 हा हेल्पलाईन क्रमांक सुरू करण्यात आला आहे.

आयुक्तालयात भरोसा सेल स्थापन करण्यात आले असून प्रत्येक पोलीस ठाण्यात महिला सहाय्यता कक्ष सुरू आहे. पोलीस ठाणे स्तरावर महिलांची सुरक्षा आणि स्वसंरक्षणासाठी उपक्रम आणि कायदेविषयक माहिती मिळण्यासाठी जनजागृतीचे कार्यक्रम घेतले जातात. निर्जन स्थळांची माहिती घेऊन संबंधितांना निर्जन ठिकाणी पुरेशा प्रकाशाची उपलब्धता करून देण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. संबंधित प्रशासनाशी संपर्क साधून निर्जन ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यासाठी सांगण्यात आले आहे.

निर्जन ठिकाणी पेट्रोलिंग वाढवण्यात आले असून 12-12 तासांच्या शिफ्टमध्ये पोलीस कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात आली आहे. दारूच्या दुकानासमोर उभा असणाऱ्या चणे,फुटाणे विकणाऱ्या गाड्या, चायनीज सेंटरवर बेकायदेशीरपणे दारू पिणाऱ्यांवर विशेष पथकाकडून कारवाई करण्यात येत आहे. आयुक्तालयाच्या हद्दीतील शाळा, महाविद्यालये, महिला आस्थापनांच्या ठिकाणी संबंधित पोलीस अधिकारी, कर्मचारी, पोलीस ठाण्याचे संपर्क क्रमांक, महिला हेल्पलाईनचा संपर्क क्रमांक दर्शनी भागात लावण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. शाळा, महाविद्यालयात होणारी मुलींची छेडछाड रोखण्यासाठी साध्या वेशातील पोलीस गस्त घालतात.

“वरील उपाययोजना केवळ कागदावर असून त्याची प्रत्यक्षात अंमलबजावणी केली जात नाही. महिला आस्थापना तसेच सर्व शाळा महाविद्यालयांमध्ये संपर्क क्रमांक लावण्यात आलेले नाहीत. सध्या वेशात पोलीस गस्त घालत नाहीत”, असा आरोप माहिती अधिकार कार्यकर्ते प्रदीप नाईक यांनी केला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.