Chinchwad : गणेशोत्सवासाठी पोलीस प्रशासन सज्ज; अतिरिक्त फौजफाटा शहरात दाखल

एमपीसी न्यूज – गणेशोत्सवात कायदा आणि सुव्यवस्था पाळण्यासाठी पोलीस प्रशासन सज्ज झाले आहे. पिंपरी- चिंचवडच्या पावणेतीन हजार पोलिसांसह सुमारे तेराशेजणांचा अतिरिक्त फौजफाटा शहरात दाखल करण्यात आला आहे. गणेश मंडळे आणि नागरिकांसह पोलीस प्रशासन देखील गणपती बाप्पांच्या आगमनासाठी तयार झाले आहे.

गणेशोत्सवादरम्यान बंदोबस्त देखरेख अधिकारी म्हणून अप्पर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे काम पाहणार आहेत. तर, प्रभारी अधिकारी उपायुक्त स्मिता पाटील, सह प्रभारी अधिकारी सहायक पोलीस आयुक्त राम जाधव, सहायक पोलीस आयुक्त चंद्रकांत असलटवर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच, स्थानिक पोलिसांनी स्वतःच्या हद्दीमध्ये बंदोबस्ताचे नियोजन केले आहे.

परिमंडळ एकसाठी 15 उपनिरीक्षक, 95 कमर्चारी, 500 होमगार्ड आणि 1 राज्य राखीव दलाची तुकडी असा बंदोबस्त पुरवण्यात आला आहे. तसेच, परिमंडळ दोनमध्ये देखील एक प्रमाणेच 15 उपनिरीक्षक, 95 कमर्चारी, 500 होमगार्ड आणि 1 राज्य राखीव दलाची तुकडी असा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. तसेच नियंत्रण कक्ष येथे देखील एका राज्य राखीव दलाची तुकडी राहणार आहे. आवश्यकतेनुसार ही तुकडी पाठवण्यात येणार आहे. या व्यतिरिक्त वाहतूक पोलिसांचा वेगळा बंदोबस्त तैनात राहणार आहे.

मागील वर्षी पोलीस दप्तरी 1 हजार 856 सार्वजनिक मंडळांची नोंद होती. मात्र, त्यापेक्षा नोंद नसलेल्या छोट्या- मोठ्या मंडळांची संख्या अधिक आहे. स्थानिक पोलिसांनी या सर्व मंडळांची माहिती संकलित केली आहे. त्यानुसार या मंडळांच्या मिरवणुकांना योग्य तो पोलीस बंदोबस्त वाटप करण्यात आला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.