Chinchwad : राममंदिर भूमिपूजनाच्या पार्श्वभूमीवर हिंदूत्ववादी कार्यकर्त्यांना पोलिसांकडून नोटीसा

शहरात 35 ठिकाणी आरती आणि मिठाई वाटपाची तयारी : Police issues notice to pro-Hindu activists on the background of Ram Mandir Bhumi Pujan

एमपीसी न्यूज – उद्या, बुधवारी अयोध्येत राम जन्मभूमी येथे श्रीराम मंदीराचे भूमीपूजन होणार आहे. या पार्श्‍वभूमीवर कोणतेही कार्यक्रम घेऊ नये म्हणून हिंदूत्ववादी कार्यकर्त्यांना पोलिसांकडून नोटीस देण्यात आली आहे. तरीदेखील कोणाच्या भावना दुखावणार नाहीत, अशा पद्धतीने 35 ठिकाणी आरती आणि मिठाई वाटप करण्याची तयारी हिंदूत्ववादी संघटनांनी केली आहे.

सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार अयोध्येतील वादग्रस्त जागेवर राम मंदिर बांधण्यात येणार आहे. राममंदीराचे भूमीपुजन बुधवारी (दि. 5) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते केले जाणार आहे.

या पार्श्‍वभूमीवर शहरात कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलीस खबरदारी घेताना दिसत आहे. हिंदू आणि मुस्लिम समाजातील प्रतिष्ठित नागरिकांच्या बैठका पोलीस स्टेशन स्तरावर घेण्यात आल्या आहेत. तसेच हिंदूत्वादी संघटनेच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी नोटीस बजावल्या आहेत.

काही कार्यकर्त्यांना पोलीस ठाणे, सहायक आयुक्‍त आणि उपायुक्‍त यांनी भेटीसाठी बोलावून बुधवारी काय कार्यक्रम घेणार, अशी विचारणा केली. शहरात राममंदीराबाबत कोणतेही फलक लावू नका, फटाके फोडू नका, महाआरती करू नका, तसेच मिठाई वाटप करू नका, अशा सूचना पोलिसांनी केल्या आहेत.

_MPC_DIR_MPU_II

पोलिसांच्या नोटीशीकडे दुर्लक्ष करीत हिंदूत्ववादी संघटनांनी शहरात ठिकठिकाणच्या 35 मंदीरामध्ये आरती करण्याचे नियोजन केले आहे. त्यानंतर प्रसाद म्हणून लाडू वाटप केले जाणार आहे.

सोशल डिस्टंसिंगचे पालन करण्याची ग्वाही या संघटनांच्या कार्यकर्त्यांनी दिली आहे. मात्र हे सर्व कार्यक्रम करताना कोणाच्याही भावना दुखावतील अशी कृती करणार नसल्याचेही या संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले आहे.

गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस आयुक्त आर. आर. पाटील म्हणाले, “बुधवारी होणाऱ्या रामजन्मभूमी मंदीर भूमीपूजनाच्या पार्श्‍वभूमीवर संवेदनशील ठिकाणी बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

कोणत्याही धार्मिक कार्यक्रमांवर बंदी घालण्यात आली आहे. शहरातील पोलिसांची गस्त वाढविण्यात आली आहे. तसेच पोलीस ठाणे स्तरावर काही जणांना नोटीसही देण्यात आली आहे.”

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.