Chinchwad Police News : पोलीस आयुक्तांनी वेषांतर करून जाणून घेतला सर्वसामान्यांप्रती पोलिसांच्या कामाचा रवैय्या

खुद्द पोलीस आयुक्तांना पिंपरी पोलीस ठाण्यात आला वाईट अनुभव

एमपीसी न्यूज – पिंपरी चिंचवड शहराचे पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश आणि सहाय्यक पोलीस आयुक्त प्रेरणा कट्टे यांनी वेषांतर करुन पोलिसांचा सर्वसामान्य नागरिकांप्रती असलेला कामाचा रवैया जाणून घेतला. यात आयुक्तांना पिंपरी पोलीस ठाण्यात अतिशय वाईट अनुभव आला. कोरोना साथीसारख्या संवेदनशील परिस्थितीतही पोलीस नागरिकांना त्यांच्या अडचणींमध्ये कशी मदत करतात हे आयुक्तांनी या वेषांतर दौ-यात जाणून घेतले.

बुधवारी (दि. 5) रात्री पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी चेहऱ्यावर दाट झुबकेदार दाढी, डोक्यावर लालसर रंगाचा केसांचा विग लावून त्यावर पांढरी गोल टोपी परिधान केली. सलवार कुर्ता आणि मास्क असा वेष परिधान करून आयुक्त बनले ‘जमालखान कमालखान पठाण’. तर सहाय्यक पोलीस आयुक्त प्रेरणा कट्टे बनल्या त्यांच्या बेगम.

वेषांतर केलेले हे पठाण दांपत्य पिंपरी चिंचवड शहरातील रस्त्यावर उतरले. सुरुवातीला आयुक्तांनी पोलीस नियंत्रण कक्षाला कॉल केला. ‘आमच्या शेजाऱ्याला कोविडसाठी रुग्णवाहिका पाहिजे होती म्हणून फोन केला तर तब्बल आठ हजार रुपये सांगितले’, अशी तक्रार त्यांनी केली. नियंत्रण कक्षातून ही माहिती पिंपरी पोलिसांना देण्यात आली. पिंपरी पोलिसांनी घटनास्थळी जाण्याऐवजी तक्रारदार पठाण यांनाच पोलीस ठाण्यात बोलावून घेतले.

मध्यरात्री सव्वाबारा वाजता पठाण दांपत्य पिंपरी पोलीस ठाण्यात खासगी टॅक्सी करून गेले. ‘रुग्णवाहिकावाला आम्हाला लूटतोय, आमची तक्रार दाखल करून घ्या’, अशी मागणी पठाण दांपत्याने केली. त्यावर पिंपरी पोलीस ठाण्यात असलेल्या पोलिसांनी पठाण यांना ‘हे आमचे काम नाही’ असे म्हणून झिडकारले. सर्वसामान्य नागरिकांना पोलीस अशी वागणूक देत असल्याने पठाण झालेले पोलीस आयुक्त संतापले. त्यांनी तात्काळ आपली ओळख दाखवत संबंधित पोलिसांना विचारणा केली.

हा वाईट अनुभव घेऊन पठाण दांपत्याने पुन्हा नियंत्रण कक्षाला फोन करून वाकड आणि हिंजवडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील दांपत्य असल्याचे सांगितले. हिंजवडी पोलीस ठाण्यात मध्यरात्री दीड, तर वाकड पोलीस चौकीत मध्यरात्री दोन वाजता पठाण दांपत्य झालेल्या आयुक्त आणि सहाय्यक आयुक्तांनी भेट दिली.

_MPC_DIR_MPU_II

हिंजवडी पोलीस स्टेशन आणि वाकड पोलीस चौकीत त्यांनी ‘आम्ही आमच्या रमजानचे उपवास ठेवतो. परिसरात काही लोक रोज फटाके वाजवतात, त्याचा आम्हाला त्रास होतो. आम्ही काही लोकांना बोललो तर त्यांनी माझ्या बायकोची छेड काढली. मला कंबरेत लाथा घातल्या. आमची झटापट झाली त्यात एकाचा मोबाईल माझ्या हातात आला आहे’ अशी तक्रार केली.

तिथे उपस्थित पोलीस कर्मचाऱ्यांनी या तक्रारीची गांभीर्याने दखल घेऊन कच्ची फिर्याद तयार केली. वरिष्ठांना बोलावून ते येईपर्यंत थांबण्याची विनंती देखील केली. पोलिसांनी दिलेल्या या सौजन्यपूर्ण वागणुकीमुळे पोलीस आयुक्तांना जरा हायसे वाटले. त्यानंतर त्यांनी आपली ओळख दाखवून पोलीस कर्मचाऱ्यांशी संवाद साधला. यावेळी उपस्थित असलेले पोलीस मात्र कावरेबावरे होऊन पाहत राहिले.

पोलीस आयुक्तांनी जाणीवपूर्वक अल्पसंख्याक समाजाच्या नागरिकांचा वेष परिधान केला. यातून संबंधित समाजाला आणि एकंदरीत सर्वसामान्य नागरिकांना पोलीस कशी वागणूक देतात, याची पाहणी करण्याचा आयुक्तांचा उद्देश होता. पिंपरी पोलीस ठाण्यात आलेल्या अनुभवाने मात्र आयुक्त संतापले आहेत. पीडित नागरिकांनी मदतीसाठी फोन केल्यावर घटनास्थळी जाणे क्रमप्राप्त असताना देखील पिंपरी पोलिसांनी पीडितांनाच पोलीस ठाण्यात बोलावून घेतले होते.

पोलिसांचे आरोग्य उत्तम राहावे म्हणून झटणारे पोलीस आयुक्त आता पोलिसांना काटेकोर शिस्त लागावी यासाठी अशा वेषांतर करून धाडी टाकत आहेत. शहरात अवैध धंदे करणाऱ्यांवर पोलीस कारवाई करत आहेत. अवैध धंद्यांवर दररोज कारवाया होत आहेत. यामुळे अवैध धंदे करणारे आणि त्यांना अभय देणाऱ्या व्हाइट कॉलर लोकांनी देखील पोलीस आयुक्तांचा धसका घेतला आहे.

मात्र नागरिकांवर कारवाई करत असताना पोलीस दलात देखील शिस्त, प्रामाणिकपणा असणे आवश्यक असल्याने आता पोलीस ठाण्यांवर आणि पोलिसांच्या कामावर धाडी टाकण्याचे काम पोलीस आयुक्त करीत आहेत. शहर भयमुक्त करण्यासाठी याची मोठी मदत होणार आहे.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.