Chinchwad : निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पिंपरी चिंचवड पोलीस दलात फेरबदल

एमपीसी न्यूज – आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयातील 12 वरिष्ठ पोलीस निरीक्षक, 13 सहाय्यक पोलीस निरीक्षक आणि 50 पोलीस उपनिरीक्षक आणि 43 पोलीस कर्मचाऱ्यांच्या अंतर्गत बदल्या करण्यात आल्या आहेत. पोलीस आयुक्त आर के पद्मनाभन यांनी सोमवारी सायंकाळी या बदल्याचे आदेश दिले.
आस्थापना मंडळामधील चर्चेनंतर हा निर्णय घेण्यात आला आहे. तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक भानुदास जाधव यांची गुन्हेशाखा युनिट दोनच्या निरीक्षकपदी तर गुन्हेशाखा युनिट दोनचे सुधाकर काटे यांची तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ निरीक्षकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. चिखली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक डॉ. विवेक मुगळीकर यांची सायबर सेलच्या प्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली आहे. तर आर्थिक गुन्हेशाखेचे श्रीराम पौळ यांच्याकडे चिखलीचा अतिरिक्त कार्यभार सोपविण्यात आला आहे. निगडीचे वरिष्ठ निरीक्षक अमरनाथ वाघमोडे यांची पिंपरी वाहतूक विभागाच्या निरीक्षकपदी तर पिंपरी वाहतूकचे उमेश तावस्कर यांची वाहतूक नियंत्रणकक्षात नियुक्ती करण्यात आली आहे.

तसेच विशेष शाखेचे वरिष्ठ निरीक्षक भीमराव शिंगाडे यांच्याकडे निगडीच्या वरिष्ठ निरीक्षकपदाचा अतिरिक्त कार्यभार सोपविण्यात आला आहे. भोसरी एमआयडीसीचे वरिष्ठ निरीक्षक राजेंद्र कुंटे यांना नियंत्रणकक्षात संलग्न करण्यात आले आहे. तर भोसरी एमआयडीसीचे निरीक्षक सतीश नांदूरकर यांच्याकडे वरिष्ठ निरीक्षकपदाचा अतिरिक्त कार्यभार सोपविण्यात आला आहे. चिखली पोलीस ठाण्याचे निरीक्षक (गुन्हे) शंकर अवताडे यांची देहूरोड वाहतूक निरीक्षकपदी नियुक्ती करण्यात आली असून, देहूरोड वाहतूकचे सतीश पवार यांची आळंदीच्या वरिष्ठ निरीक्षकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. आळंदीचे वरिष्ठ निरीक्षक रवींद्र चौधर यांना नियंत्रणकक्षात संलग्न करण्यात आले आहे.
त्याचबरोबर आयुक्तालयातील 15 पोलिस ठाणी, नियंत्रणशाखा, वाहतूक शाखेतील 13 सहाय्यक पोलीस निरीक्षक, 50 पोलीस उपनिरीक्षक आणि 43 पोलीस कर्मचाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. या बदल्या नोव्हेंबर 2019 पर्यंत कायम राहण्याची शक्यता आहे.