BNR-HDR-TOP-Mobile

Chinchwad : नागरिकांच्या फोनला उशिरा प्रतिसाद देणाऱ्या पोलिसांना परेडची शिक्षा

677
PST-BNR-FTR-ALL

एमपीसी न्यूज – पोलीस आयुक्त आर के पद्मनाभन यांनी कमी मनुष्यबळात चांगले काम करण्यासाठी तसेच नागरिकांना पोलीस मदत तात्काळ मिळावी यासाठी फोन अ फ्रेंड हा उपक्रम सुरू केला. नागरिकांनी फोन केल्यानंतर अवघ्या काही मिनिटात संबंधित पोलीस ठाण्यातील एक पथक घटनास्थळी जाऊन संबंधित व्यक्तीला मदत करत होते. सुरुवातीला तात्काळ प्रतिसाद देणारी पथके काही दिवसांनी नागरिकांच्या फोनला प्रतिसाद देण्यास टाळाटाळ करू लागली. तसेच काही ठिकाणी अत्यंत उशिरा पोहोचू लागली. यामुळे आयुक्तांनी अशा नागरिकांच्या फोनला उशिरा प्रतिसाद देणा-या आयुक्तालयातील 91 पोलीस कर्मचा-यांना परेडची शिक्षा दिली. पोलीस आयुक्तालयाच्या आवारतच मंगळवारी (दि. 12) तब्बल सात तास परेड करायला लावण्यात आली.

आयुक्तांनी नागरिकांना आवाहन केले होते की, तुमच्या सोबत किंवा तुमच्या परिसरात कोठे गुन्हा घडत असेल तर पोलिसांना फोन करा. त्यानंतर अवघ्या दहा ते पंधरा मिनिटात पोलीस घटनास्थळी पोहचतील. त्यासाठी पोलीस ठाणे पातळीवर किमान दोन असे जलद प्रतिसाद पथक तयार करण्यात आले होते. त्यानुसार फोन येताच टीमने तेथे त्वरित पोहचणे अपेक्षित होते. त्यासाठी पिंपरीच्या एका चित्रपटगृहात आयुक्तांनी एक चाचणीही घेतली होती. मात्र नंतर पोलीस कर्मचाऱ्यांनी याला सोयीने घेतले. एखाद्या तक्रारदाराकडून पोलिसांना मदतीसाठी फोन केला असता पोलीस फोनवरच माहिती घेत होते व घटनास्थळी तास ते दोन तास उशीरा पोहचत होते. तर दुसऱ्या बाजूला नोंदवहीवर दहा मिनीटात पोहचले असा शेरा देत होते.

मात्र हा तक्रारींचा ओघ कमी होत नसल्याने आयुक्तांनी स्वतः याची पडताळणी केली असता सारा प्रकार उघडकीस आला. त्यांनी स्वतः तक्रारदारांशी संवाद साधला आणि काही ठिकाणी पोलीस घटनास्थळी पोहोचलेच नाहीत अथवा खूप उशीरा पोहोचल्याचे समोर आले. यासंदर्भात पोलीस आयुक्तांनी सोमवारी (दि. 11) आयुक्तालयात संबंधित पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकांना बोलावून चांगलीच कानउघडणी केली. तसेच जे कर्मचारी कामचुकारपणा करत होते अशा 91 कर्मचाऱ्यांना पोलीस आयुक्तालयासमोर सकाळी दहा ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत परेड करायला लावली.

पोलीस उपायुक्त विनायक ढाकणे म्हणाले, “फोन अ फ्रेंड या उपक्रमामध्ये नागरिकांचा मदतीसाठी फोन आल्यानंतर संबंधित पोलीस ठाण्याच्या टीम ला नागरिकाचा फोन क्रमांक देण्यात येत होता. मात्र यापुढे त्यांना तो क्रमांक न देता नियंत्रण कक्षाकडून केवळ घटनेची माहिती दिली जाईल. टीमला घटनास्थळावर जाऊन रिपोर्टींग करणे बंधनकारक राहणार आहे. निवडणूक काळात कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांना ही परेड घडवली जात आहे”

.

HB_POST_END_FTR-A1
HB_POST_END_FTR-A3