Chinchwad : बाहेर जाऊन त्या ‘आखडू’ला घरात घेऊन येऊ नका; पिंपरी-चिंचवड पोलिसांचे नागरिकांना आवाहन

एमपीसी न्यूज – कोरोना विषाणू हा संसर्गजन्य आहे. संसर्ग झाल्याशिवाय त्याची बाधा होत नाही. त्यामुळे नागरिकांनी सोशल डिस्टन्स ठेवणं अत्यंत गरजेचं आहे. संचारबंदीच्या काळात घराबाहेर न पडता घरातच सुरक्षित राहण्याचे आवाहन करताना पिंपरी-चिंचवड पोलिसांनी ‘कोरोना विषाणू खूप आकडू आहे, त्याला आणायला घराबाहेर गेल्याशिवाय तो घरात येणार नाही. त्यामुळे घराबाहेर जाऊन त्या ‘आखडू’ला घरात आणू नका’ असे ट्विट करत नागरिकांना संचारबंदीचे पालन करून सुरक्षित राहण्याचे आवाहन केले आहे.

राज्यात कोरोनाबधितांची संख्या वाढत आहेत. त्यात हा आजार संसर्गजन्य असल्याने जेवढी काळजी घेईल तेवढी थोडीच आहे. नागरिकांचा एकमेकांशी मोठ्या प्रमाणात संपर्क येऊ नये. तसेच गर्दी टाळण्यासाठी सुरुवातीला जमावबंदी आणि त्यानंतर संचारबंदी करण्यात आली. जीवनावश्यक वस्तू आणि सेवा पुरविणाऱ्या वाहनांच्या व्यक्तिरिक्त कोणतेही वाहन रस्त्यावर, गल्लीत येणार नसल्याचे आदेश देखील पोलीस आयुक्तांनी दिले.

आदेश दिल्यानंतर प्रत्यक्षात पोलिसांकडून चौकाचौकात आणि रस्त्यांवर आदेशाची काटेकोरपणे अंमलबजावणी केली जात आहे. दरम्यान, सोशल मीडियावरून नागरिकांशी संपर्क साधत त्यांना वेळोवेळी सूचनाही दिल्या जात आहेत. कोरोना विषाणू आपल्या दारापर्यंत येऊन पोहोचला आहे. घराबाहेर जाऊन त्याला घरात घेऊन येऊ नका, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.

पिंपरी चिंचवड पोलिसांनी आपल्या ट्विटरवर म्हटले आहे की,

‘ऐका ना राव,

हा कोरोना व्हायरस ना लई आखडू आणि इगोवाला आहे. त्याला घराबाहेर घ्यायला आल्याशिवाय येतच नाही !

जाऊ द्याना मग

त्या आखडूला आणायला कशाला घराबाहेर जाता?

मस्त घरी रहा, स्वस्थ रहा.’

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.