Chinchwad : संवेदनशील ठिकाणांची गस्त होणार स्मार्ट पद्धतीने; एटीएम, सराफी पेढ्यांना देणार क्यूआर कोड

एमपीसी न्यूज – रात्रगस्तीवरील पोलिसांनी एटीएम सेंटर आणि संवेदनशील ठिकाणांची तपासणी केली आहे का, याची माहिती मिळण्यासाठी शहरातील एटीएम सेंटरला क्‍यूआर कोड देण्यात येणार आहे. येत्या महिनाभरात हे काम केले जाणार असून पोलीस संवेदनशील ठिकाणी जातात की नाही याची तपासणी आता स्मार्ट पद्धतीने केली जाणार असल्याची माहिती पोलीस आयुक्‍त संदीप बिष्णोई यांनी दिली.

शहरातील वाढत्या एटीएम फोडीच्या घटना रोखण्यासाठी रात्रगस्तीवरील पोलिसांना एटीएम तपासणी करण्याचे आदेश पोलीस आयुक्‍तांनी दिले आहेत. मात्र तरीही एटीएम फोडीच्या घटना घडत आहेत. आम्ही त्या एटीएमला भेट दिली होती, असे पोलीस कर्मचारी सांगतात. मात्र पोलिसांच्या या तपासणीबाबतही प्रश्‍नचिन्ह निर्माण होत आहे. रात्रगस्तीवरील पोलिसांनी खरोखरच एटीएमला भेट दिली की नाही, याबाबतची माहिती मिळावी, यासाठी एटीएम सेंटरला क्‍यूआर कोड दिला जाणार आहे.

रात्रगस्तीवरील अधिकारी किंवा कर्मचाऱ्याने एटीएम सेंटरला भेट दिल्यावर ते पोलीस क्‍यूआर कोड स्कॅन करतील. क्‍यूआर कोड स्कॅन केल्यावर याबाबतची माहिती वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना मिळणार आहे. जर तपासणी केली नाही तर याबाबत दुसऱ्या दिवशी खुलासा विचारला जाईल. यामुळे एटीएम फोडीच्या घटनांना आळा बसेल, असा विश्‍वास पोलीस आयुक्‍तांनी व्यक्‍त केला.

पोलिसांनी वारंवार सूचना देऊनही बँक एटीएमच्या सुरक्षिततेकडे दुर्लक्ष करतात. ज्या बँका आपल्या एटीएमच्या सुरक्षिततेकडे दुर्लक्ष करतात, अशा बँकेतील खाते नागरिकांनी बंद करावे, असे अजब आवाहन पोलीस आयुक्‍त संदीप बिष्णाई यांनी नागरिकांना केले आहे. जर खातेदारांची संख्या कमी झाली तर बँका जागेवर येतील, असा विश्‍वास आयुक्‍तांनी व्यक्‍त केला.

बँकांच्या हलगर्जीपणाबाबत आरबीआयशी पत्रव्यवहार करणार

एटीएम सेंटर उभारताना काय करावे, याबाबत आरबीआयने काही मार्गदर्शक तत्वे जाहीर केली आहेत. मात्र बँका त्याकडे दुर्लक्ष करतात. पोलिसांनी वारंवार सूचना देऊनही त्याकडे बँका दुर्लक्ष करतात. यामुळे आगामी काळात बँकांच्या हलगर्जीपणाबाबत रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (आरबीआय)ला कळविण्यात येणार असल्याचे पोलीस आयुक्‍त संदीप बिष्णोई यांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.