Chinchwad: वन, पाणी, मृद व पर्यावरण रक्षण ही जागतिक चळवळ व्हावी – पोपटराव पवार

एमपीसी न्यूज – भारतातील तीनशे पन्नास जिल्हे व बारा राज्ये पाण्यासाठी संघर्ष करीत आहेत. आठ हजार गावात पाणी पातळी अतिशोषित झाली आहे. विकासाच्या नावाखाली माती आणि पाण्याचे अवमूल्यन झाले आहे. यावर नियंत्रण मिळवायचे असेल तर वन संरक्षण, पाणी संवर्धन, मृद संधारण आणि पर्यावरण रक्षण ही जागतिक चळवळ झाली पाहिजे, तरच मानवी जीवन सुरक्षित राहील, असे मत राज्य सरकारच्या आदर्श ग्राम उपक्रमाचे कार्यकारी संचालक हिवरे गावचे सरपंच पोपटराव पवार यांनी व्यक्त केले.

पोपटराव पवार यांना ‘पद्मश्री’ पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचा प्रथमच पिंपरीत सोमवारी (दि. 9) जाहीर सत्कार करण्यात आला. यावेळी क्रांतिवीर चापेकर स्मारक समितीचे अध्यक्ष गिरीश प्रभुणे, सतीश भट उपस्थित होते.

पोपटराव पवार म्हणाले की, जगाला मानवाच्या कल्याणाचा मार्ग दाखविणारी भारत ही कर्मभूमी आहे. वड, पिंपळ, उंबर, रामफळ, आंबा अशी दीर्घायुष्याची झाडे लावा, असे जगद्‌गुरु संत तुकाराम महाराजांनी सांगितले आहे. आपल्या संस्कृतीत या झाडांना देवत्व दिले आहे. त्याच्या मागचा उद्देशच पर्यावरण आणि पाणी रक्षण हा आहे. जगाला भारताने योगा आयुर्वेदासह निसर्गाधारित जगण्याचे मार्गदर्शन दिले. मानवी कल्याणासाठी केलेली व्यवस्था म्हणजे आपली भारतीय संस्कृती होय, परंतू आताची पिढी पाश्चिमात्यांचे अनुकरण करण्यात धन्यता मानत आहे.

महात्मा गांधींनी स्वातंत्र्यानंतरचा भारत म्हणजे, ‘ग्राम स्वराज्य योजना’ असे सांगितले होते. खरं ‘स्वराज्य’ ग्राम योजनेतूनच मिळेल. दुर्दैवाने तसे झाले नाही, शहरात इंडिया झाला आणि गावात भारत राहिला. इंडिया विरुध्द भारत यामुळे ‘इंडो भारत’ तयार झाला. यातून विकासाऐवजी अखिल मानवी जीवनच धोक्यात आणणा-या समस्या निर्माण झाल्या. सगळी धरण शेती समोर ठेवून बांधली. परंतू त्याचा लाभ शेतीला मिळाला नाही. औद्योगिक शहरी प्रदूषणामुळे नद्यांची ऑक्सीजनची पातळी खाली गेली आहे. जगात शंभरांहून जास्त देश पाण्यासाठी संघर्ष करीत आहेत, असेही पवार म्हणाले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.