Chinchwad : खासगी सुरक्षा रक्षकही कोरोनाच्या लढाईसाठी रस्त्यावर

एमपीसी न्यूज – कोरोनाच्या लढाईत पिंपरी चिंचवड पोलिसांनी पोलीस प्रायव्हेट सिक्युरिटी पार्टनरशिप प्रोग्राम अंतर्गत खासगी सुरक्षा रक्षकांना देखील रस्त्यावर उतरविण्यात आले आहे. शहरातील विविध चेकपोस्टवर हे सुरक्षा रक्षक पोलिसांसोबत सेवा देत आहेत.

पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालायकडे पोलीस मनुष्यबळ कमी आहे. त्यामुळे वेळोवेळी बंदोबस्तासाठी मोठ्या प्रमाणात राखीव पोलीस दल, होमगार्ड आणि अन्य यंत्रणांची मदत घ्यावी लागते. सध्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण देशात लॉकडाऊन जारी करण्यात आला आहे. त्यामुळे नागरिकांना जीवनावश्यक कारणाशिवाय घराबाहेर येण्यावर बंधने आली आहेत. विनाकारण घराबाहेर दिसल्यास पोलिसांकडून कारवाई केली जात आहे.

पोलीस आणि प्रशासनाने अनेकवेळा सांगूनही काही नागरिक घरी बसायला तयार नाहीत. विनाकारण घराबाहेर पडणाऱ्या नागरिकांची यादी वाढत आहे. अशा नागरिकांवर पोलिसांकडून कारवाई देखील केली जात आहे. मात्र, पिंपरी चिंचवड पोलिसांकडे अपुरे मनुष्यबळ असल्याने त्यांना अन्य यंत्रणांची मदत घ्यावी लागत आहे. पोलीस प्रायव्हेट सिक्युरिटी पार्टनरशिप प्रोग्राम अंतर्गत खासगी सुरक्षा रक्षक पुरविणाऱ्या कंपन्यांच्या सुरक्षा रक्षकांना रस्त्यावर उतरविण्यात आले आहे.

खासगी सुरक्षा रक्षक शहरातील विविध चेकपोस्टवर पोलिसांसोबत सेवा देत आहेत. मात्र, हे सर्व सुरक्षा रक्षक आपल्या स्वेच्छेने कोरोनाच्या विरोधात लढण्यासाठी रस्त्यावर उतरले आहेत.

 “खासगी कंपन्यांचे सुरक्षा रक्षक पोलिसांसोबत कोरोनाच्या लढाईत रस्त्यावर उतरले आहेत. त्यांची पोलिसांना मदत होत आहे. स्वयंसेवी भावनेने त्यांचे काम सुरू आहे. नागरिकांनी प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे. अन्यथा कठोर कारवाई केली जाईल.” रामनाथ पोकळे – अपर पोलीस आयुक्त 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.