Chinchwad : संस्कार भारतीच्या नाट्यविधा अंतर्गत रंगले ‘कौंतेय’ नाटकातील प्रवेशांचे नाट्य अभिवाचन

पिंपरी-चिंचवड संस्कारभारती व चिंचवडगाव देवस्थानच्या संयुक्त विद्यमाने आयोजित “कलासेवा” या उपक्रमातील चौथा कार्यक्रम नाट्यविधेच्या कलाकारांनी शनिवारी (दि. 23) सादर केला.

यावेळी ज्येष्ठ नाटककार वि.वा.शिरवाडकर यांच्या ‘कौंतेय’ नाटकातील प्रवेशांचे नाट्य अभिवाचन करण्यात आले. या नाटकात महाभारतातील कर्ण आणि कुंती ह्या दोन महत्वाच्या व्यक्तिरेखांच्या वेदना आणि मनोव्यापार अतिशय प्रभावीपणे मांडला आहे. या कार्यक्रमाला नाट्य विधा प्रमुख नरेंद्र आमले यांनी प्रभावी वाचनातून कर्णाची भूमिका उलगडली. पि. चि. दस्तऐवज प्रमुख मधुवंती हसबनीस, सुयश कुलकर्णी, नरेंद्र कुलकर्णी, साहित्य विधा प्रमुख विशाखा कुलकर्णी, सुहास जोशी यांनी या नाट्यप्रवेशाचे सुंदर अभिवाचन केले. उपस्थित रसिकांनीही या नाट्य अभिवाचनाला विशेष दाद दिली.

“प्रत्येक महिन्याच्या दुसर्‍या व चौथ्या शनिवारी नृत्य,नाट्य,संगीत व साहित्य ह्या कलाप्रकारांची सेवा चिंचवड देवस्थानच्या ‘मंगलमूर्ती’ वाड्यात सादर केली जाते” असे संस्कार भारती पिंपरी-चिंचवडचे सचिव हर्षद कुलकर्णी यांनी सांगितले.

या कार्यक्रमाला सुषमा वैद्य, सहसचिव पिं. चिं. संस्कार भारती सुहास कुलकर्णी आदी मान्यवर उपस्थित होते. प्रास्ताविक सुहास जोशी यांनी केले तर सुयश कुलकर्णी यांनी आभार मानले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.