Chinchwad : भाजपकडून नागरिकांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी दुर्दैवी – राहुल कलाटे

एमपीसी न्यूज – पिंपरी महापालिकेतील सत्ताधारी भाजप नागरिकांना मुलबक पाणी देऊ शकत नसतानाच आता सत्ताधा-यांकडून अनधिकृत नळजोड धारकांवर फौजदारी कारवाईची मागणी केली जाते. हे नागरिकांचे व शहराचे दुर्दैव आहे, अशी टीका शिवसेना गटनेते राहुल कलाटे यांनी केली आहे.

शहरातील पाण्याची समस्या गंभीर होत असल्याने यापुढे शहरात नवीन गृहप्रकल्पांना परवानगी देण्यात येऊ नये. अनधिकृत नळजोडधारकांवर फौजदारी गुन्हे दाखल करा अशी सूचना भाजप शहराध्यक्ष आमदार लक्ष्मण जगताप यांनी महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांना केली आहे. त्याला शिवसेना गटनेते राहुल कलाटे यांनी आक्षेप घेतला आहे.

कलाटे यांनी आयुक्तांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, शहरातील नागरिकांना गेल्या अनेक महिन्यांपासून पाणीपुरवठा सुरळीत होत नाही. याबाबत अनेक तक्रारी येत आहेत. परंतु, प्रशासन व सत्ताधारी यापैकी कोणीही आजपर्यंत यावर तोडगा काढू शकले नाही. हे या शहराचे दुर्दैव आहे. शहरातील नवीन बांधकामांना परवानगी देऊ नये, हा भाजपच्या शहराध्यक्षांनी सुचविलेला पर्याय योग्य नाही. याची कायदेशीर तपासणी करुन योग्य तो निर्णय घ्यावा.

_MPC_DIR_MPU_II

शहरातील बांधकामे थांबवू नयेत. यामुळे शहरात काही प्रमाणात लोकांना रोजगार मिळतो, तो ही बंद होईल. देशात राज्यात व शहरात बेरोजगारांचे प्रमाण वाढलेले आहेत. ते आणखी वाढवू नये. गेल्या 15 वर्षात नियोजन करण्यात आले नाही. त्याची जवाबदारी स्वत: शहराध्यक्ष तथा आमदार लक्ष्मण जगताप यांनी स्वीकारावी.

शहरातील बेकायदेशीर नळ कनेक्शन कोणत्याही परिस्थितीत तोडण्यात येऊ नयेत. एका बाजूला करदाते म्हणून सहानुभुती दाखवणे व दुस-या बाजूला त्यांना पाणी न देणे असे फसवे काम सत्ताधा-यांच्या मागणी वरुन प्रशासनाने करु नये. नळजोड नियमित करण्यासाठी चांगले धोरण करावे. अवैध नळजोड धारकांवर गुन्हा दाखल करु नये. शहरात चांगल्या सुविधा देणारी यंत्रणा म्हणून प्रशासनाची भूमिका असली पाहिजे

सत्ताधारी भाजप मात्र शहरातील नागरिकांवर अन्याय करण्यासाठी पोलिसांकडे गुन्हे दाखल करा म्हणून मागणी करत आहे. हे नागरिकांचे आणि शहराचे दुर्दैव आहे. सध्या वाचविणारेच अडकविण्याच्या भूमिकेत असल्यामुळे नागरिकांचे हाल होत आहेत. यासाठी महापालिका प्रशासनाने सत्ताधा-यांच्या कुठल्याही दबावाला बळी न पडता लोकहिताचे निर्णय घ्यावेत, अशी मागणी कलाटे यांनी केली आहे. याबाबत महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांना पत्र देण्यात आले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

_MPC_POSTEND_MAT_1