Chinchwad : ईद आणि अयोध्या निकालाच्या पार्श्वभूमीवर शहरात जमावबंदी

एमपीसी न्यूज – मुस्लिम बांधवांचा ईद ए मिलाद हा सण 10 नोव्हेंबर (रविवारी) रोजी आहे. तर येत्या काही दिवसात राम जन्मभूमी-बाबरी मशीद प्रकरणाचा निकाल येण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर पिंपरी चिंचवड पोलिसांनी शहरात जमावबंदीचे आदेश दिले आहेत. पुढील काही दिवस पोलिसांची प्रत्येक संशयास्पद हालचालींवर करडी नजर असणार आहे. तसेच या पार्श्वभूमीवर प्रतिबंधात्मक कारवाई देखील करण्यात येणार आहे.

रविवारी (दि. 10 नोव्हेंबर) रोजी ईद ए मिलाद हा सण आहे. त्यानंतर मंगळवारी (दि. 12 नोव्हेंबर) रोजी गुरू नानक जयंती आहे. तसेच येत्या काही दिवसात अयोध्या येथील राम जन्मभूमी-बाबरी मशीद प्रकरणाचा निकाल येण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर शहरात कोणत्याही प्रकारची अनुचित घटना घडू नये, शहरात शांत व सुव्यवस्था राहावी यासाठी पिंपरी चिंचवड पोलीस सतर्क झाले आहेत. पोलीस आयुक्त संदीप बिष्णोई यांनी नुकतेच जमावबंदीचे आदेश दिले आहेत.

पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयातील 15 पोलीस ठाण्याच्या हद्दीत पोलिसांनी रूटमार्च, कोंबिंग ऑपरेशन सुरू केले आहे. तसेच अन्य प्रतिबंधात्मक कारवाया देखील करण्यात येत आहेत. अयोध्या प्रकरणाच्या निकालानंतर कोणत्याही प्रकारचा आनंदोत्सव व निषेधसभा घेऊ नये, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे. जमावबंदीचे उल्लंघन व न्यायालयाचा अवमान करणा-यांवर कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचेही पोलिसांकडून सांगण्यात आले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.