Chinchwad : सराफी दुकानांवर लक्ष ठेवा; अपर आयुक्‍त रामनाथ पोकळे यांच्या पोलिसांना सूचना

एमपीसी न्यूज – गेल्या काही दिवसांपासून सराफी दुकानात चोरी करण्याच्या प्रकारांमध्ये वाढ झाली आहे. यामुळे रात्रीच्यावेळी सराफी दुकानांवर लक्ष ठेवा, असे आदेश पिंपरी चिंचवडचे अपर पोलीस आयुक्‍त रामनाथ पोकळे यांनी पोलिसांना दिले आहेत.

वाकड पोलीस ठाण्याच्या हद्दीत एकाच रात्रीत दोन ठिकाणी सराफांची दुकाने फोडली होती. त्यानंतर वाल्हेकरवाडी, चिंचवड येथेही सराफी दुकानात चोरी झाली. यामुळे सराफांच्या मनात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या पार्श्‍वभूमीवर अपर पोलीस आयुक्‍त रामनाथ पोकळे यांनी शहरातील सर्व पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक, गुन्हे शाखेचे अधिकारी यांची नुकतीच एक बैठक घेतली. या बैठकीत त्यांनी पोलिसांना विविध सूचना दिल्या आहेत.

रात्रीच्यावेळी पोलिसांची गस्त वाढवावी. सराफी दुकानाबाहेर रात्रीच्या वेळी पाहणी करणाऱ्या पोलिसांची वेळ आणि स्वाक्षरीसाठी वही ठेवावी. सशयित वाहनांची तपासणी करावी. तसेच ठिकठिकाणी नाकाबंदीही करावी, अशा सूचना त्यांनी पोलिसांना दिल्या. तसेच पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सराफांची बैठक बोलवावी. सुरक्षेविषयक सूचना सराफांना द्याव्यात. दुकानाच्या सुरक्षिततेसाठी सुरक्षा रक्षक नेमावेत. आपल्या दुकानात तसेच आसपासच्या परिसरात जास्तीत जास्त सीसीटिव्ही कॅमरे कसे लावता येतील, याकडे लक्ष द्यावे. तसेच सिक्‍युरिटी अलार्म, उच्च दर्जांचे सेंट्रल लॉक व कुलूप लावण्यासाठी सराफांना तयार करावे, अशाही सूचना या बैठकीत देण्यात आल्या आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.