Chinchwad : तुळजाभवानी देवीचे मंदिर, गणेश मंदिरावर कारवाई करु नका

घर बचाव संघर्ष समितीची प्राधिकरणाकडे मागणी

एमपीसी न्यूज – चिंचवड, बिजलीनगर येथील पुरातन बांधावरची देवी म्हणून परिसरात प्रसिद्ध असणारे तुळजाभवानी देवीचे मंदिर आणि शिवनगरी येथील 2005 मध्ये स्थापन झालेले गणेश मंदिरावर प्राधिकरणाने कारवाई करु नये. मंदिर पडण्याची मोहीम ही एकतर्फी असून नैसर्गिक न्यायतत्वाचे तसेच धार्मिक स्वातंत्र्याचे पूर्णपणे उल्लंघन होत आहे. जोपर्यंत सुनावणी, पुनः निरीक्षण, समिती अध्यक्ष अपील या कायद्याच्या प्रक्रिया पूर्ण होत नाही तोपर्यंत मंदिरांवर कारवाई करू नये, अशी मागणी घर बचाव संघर्ष समितीने प्राधिकरण प्रशासनाकडे केली आहे.

संघर्ष समितीच्या शिष्टमंडळाने बिजलीनगर येथील नागरिकांसमवेत प्राधिकरणाचे अध्यक्ष सदाशिव खाडे, मुख्य कार्यकारी अधिकारी सतीशकुमार खडके, क्षेत्रीय अधिकारी वसंत नाईक यांची भेट घेतली. घर बचाव संघर्ष समितीचे मुख्य समन्वयक विजय पाटील,समन्वयक आबा सोनवणे, संतोष चव्हाण, शुभम वाघमारे, मंदिर विश्वस्त संभाजी जराड, निलेश चौघुले, दत्तात्रय होले, सुनील होले, विशाल घावटे, सचिन पाटील, अभिषेक जराड, शंकर चोगुले, बंटी महाजन उपस्थित होते.

विजय पाटील म्हणाले,”गेल्या वर्षी प्राधिकरण प्रशासनाकडे मंदिर परिसरातील 750 राहिवाशांनी सूचना व हरकती नोंदवल्या होत्या. या मंदिरांवर कारवाई का करू नये याबाबतही निवेदन दिले होते. त्यानंतर तदनंतर राहिवाशांना सुनावणीसाठी बोलविण्यात आले नाही .त्यामुळे आता मंदिर पडण्याची मोहीम ही एकतर्फी आहे. नैसर्गिक न्यायतत्वाचे तसेच धार्मिक स्वातंत्र्याचे पूर्णपणे उल्लंघन होत आहे. जोपर्यंत सुनावणी, पुनः निरीक्षण, समिती अध्यक्ष अपील या कायद्याच्या प्रक्रिया पूर्ण होत नाही. तोपर्यंत मंदिरांवर कारवाई करू नये. सुप्रीम कोर्टानेही कारवाई करताना धार्मिक स्वातंत्र्याचे व नियमांचे उल्लंघन करू नये असे निर्देश दिलेले आहेत. त्याचे पालन प्राधिकरण प्रशासनाने करावे”

मुख्य कार्यकारी अधिकारी सतीश खडके म्हणाले,”अनधिकृत मंदिरांवर कारवाई करण्याचे सुप्रीम कोर्टाचे आदेश असल्याकारणाने मंदिरांवर कारवाई केली जात आहे. शहरातील 128 मंदिरांपैकी 124 मंदिरे नियमित केली आहेत. चार मंदिरे उच्चदाब विजवाहिनीच्या खाली असल्यामुळे कारवाई करीत आहोत. तरीही मंदिरांचे पुनः निरीक्षण केले जाईल. तसेच परिसरातील राहिवाशांची हरकती आणि सूचनांवर सुनावणी घेतली जाईल”

अध्यक्ष सदाशिव खाडे म्हणाले, “ज्या प्रमाणे शहरातील 124 मंदिरे नियमित केली. त्याप्रमाणे या मंदिरांवर कारवाई करण्यापूर्वी रहिवाशांचे म्हणणे प्रशासनाने ऐकून घ्यावे. या दोनही मंदिरांचे निरीक्षण मी स्वतः करण्यासाठी येईन. धार्मिक लोकभावनेचा नक्कीच आदर ठेवला जाईल”

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.