Chinchwad: सेवानिवृत्त वेतनधारकांच्या अनुभवाचा लाभ शहर विकासासाठी व्हावा -उषा ऊर्फ माई ढोरे

एमपीसी न्यूज – सेवानिवृत्त वेतनधारक हे कोणाच्याही डोक्यावरचे ओझे नसून त्यांनी सन्मानाने जगावे. त्यांच्या अनुभवाचा लाभ शहराच्या विकासाठी व्हावा, असे मत महापौर उषा उर्फ माई ढोरे यांनी व्यक्त केले.

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या माहिती व जनसंपर्क विभागामार्फत सेवानिवृत्त वेतनधारक दिनानिमित्त शहरातील सेवानिवृत्त वेतनधारकांसाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन आज (गुरुवारी) चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण प्रेक्षागृहात केले होते. त्याच्या उदघाटनप्रसंगी महापौर बोलत होत्या.

यावेळी नगरसदस्या अनुराधा गोरखे, सहाय्यक आयुक्त अण्णा बोदडे, चिंचवड ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष रमेश इनामदार, जलतज्ञ रामदास जंगम, पिंपरी चिंचवड सेवानिवृत्त सेवक परिषदेचे दीपक रांगणेकर, श्रीकांत मोने, व्यंकटेश पांडे, नारायण सोनार, यशवंत चासकर, चंद्रकांत झगडे, गोविंद खवासखान, गणेश विपट, कुमुदिनी घोडके, विजया जीवतोडे, शैलजा कुलकर्णी, श्रीराम परबत, प्रभारी जनसंपर्क अधिकारी रमेश भोसले आदी उपस्थित होते.

यावेळी महापौर उषा ढोरे म्हणाल्या, सेवानिवृत्त कर्माचा-यांनी उर्वरित आयुष्यात राहून गेलेल्या इच्छा पूर्ण कराव्यात. कार्यक्रमाच्या निमित्ताने सर्वांच्या गाठीभेटी होतात. त्यातून संवाद वाढतो. संवादातून चांगल्या गोष्टी घडतात. आज शहराच्या विकासाचा सेवानिवृत्त कर्मचारी अविभाज्य घटक आहेत. निवृत्त झालेले कर्मचारी संसार चालवत असताना शहराचा विकासच करतात असतात. अनेक गोष्टींचा त्याग करून कर्मचारी सेवानिवृत्त होतात.

त्यानंतर रमेश इनामदार म्हणाले, प्रत्येक माणसाने स्वतःमध्ये आनंद शोधला पाहिजे. मनुष्याने आनंद वाटावा तसेच इतरांच्या आनंदामध्ये आनंद मिळवावा म्हणजे मनुष्य समाधानी होईल. अहंकार आणि कोणत्याही गोष्टीचा मोह माणसाचा आनंद नष्ट करतो.

रामदास जंगम म्हणाले, सेवानिवृत्त झालेले कर्मचारी चंदनाप्रमाणे झीजून निवृत्त झालेले आहेत. सरकारने सेवानिवृत्त कर्मचा-यांच्या अनुभवाचा उपयोग करून घेतल्यास देशाच्या प्रगतीसाठी नक्कीच मदत होईल. देशात पाण्याची समस्या गंभीर होत असून प्रत्येकाने पाणी बचतीसाठी पुढाकार घेणे गरजेचे आहे. आज केलेली पाण्याची बचत उद्याच्या पिढीसाठी फायदेशीर ठरणार आहे, असेही ते म्हणाले.

या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन माहिती व जनसंपर्क विभागाचे प्रफुल्ल पुराणिक यांनी केले तर, कालंदी डांगे यांनी आभार मानले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.