Chinchwad Crime News : चोरीच्या सात घटनांमध्ये तीन लाख 37 हजारांचा मुद्देमाल चोरीला

एमपीसी न्यूज – सांगवी, एमआयडीसी भोसरी, भोसरी, हिंजवडी, दिघी, पिंपरी पोलीस ठाण्याच्या हद्दीतून अज्ञात चोरट्यांनी तीन लाख 37 हजार 150 रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला. यामध्ये दागिने, रोख रक्कम, दुचाकी, मोबाईल फोन यांचा समावेश आहे.

सृष्टी चौक, पिंपळे गुरव येथे रविवारी (दि. 31) दुपारी घरफोडीचा प्रकार उघडकीस आला. दुर्गा खुशाल सदार (वय 55, रा. पिंपळे गुरव) यांनी याप्रकरणी सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांच्या घरातून अज्ञात चोरट्यांनी 20 हजारांचे मंगळसूत्र, आठ हजारांचे मंगळसूत्र, 20 हजारांचे कानातील झुमके, वेल, 20 हजारांची चेन, 10 हजारांची सोन्याची अंगठी आणि 58 हजारांची रोख रक्कम असा एकूण एक लाख 36 हजारांचा ऐवज घरोफोडी करून चोरून नेला.

पिंपळे गुरव येथे आणखी एक चोरीचा प्रकार उघडकीस आला. घराच्या उघड्या दरवाजातून प्रवेश करून अज्ञात चोरटयांनी 20 हजारांचे मंगळसूत्र, 20 हजारांचे कानातील झुमके, चार हजारांची सोन्याची अंगठी, दोन हजारांचे कानातील कुडके असे एकूण 46 हजारांचे दागिने चोरून नेले. सारिका जीवन बिराजदार (वय 28, रा. पिंपळे गुरव, सांगवी) यांनी याप्रकरणी सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

राहुल विजय कोंडे (वय 28, रा. सदगुरुनगर, भोसरी) यांनी एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. टाटा मोटर्स कंपनीच्या मटेरीयल गेट जवळून फिर्यादी यांची 40 हजारांची दुचाकी अज्ञात चोरट्यांनी चोरून नेली. ही घटना शनिवारी (दि. 30) घडली.

अशितोष बाळू मोरडे (वय 23, रा. मोरडेवाडी, ता. मंचर, पुणे) यांनी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. कै. अंकुशराव लांडगे नाट्यगृहाच्या जवळ असलेल्या भाजी मंडई येथे पार्क केलेली फिर्यादी यांची 40 हजारांची दुचाकी अज्ञात चोरट्यांनी चोरून नेली. ही घटना 28 ऑक्टोबर रोजी सायंकाळी सहा ते रात्री नऊ वाजताच्या कालावधीत घडली.

हिंजवडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत चांदणी चौकात आणखी एक दुचाकी चोरीचा प्रकार उघडकीस आला आहे. राहुल रामदास पाटोळे (वय 40, रा. दापोडी) यांनी याप्रकरणी फिर्याद दिली आहे. अज्ञात चोरट्याने फिर्यादी यांची 12 हजारांची दुचाकी 28 ऑक्टोबर रोजी दुपारी साडेचार ते रात्री आठ वाजताच्या कालावधीत चोरून नेली.

आशा महेंद्र सरदार (वय 29, रा. देहूफाटा, आळंदी) यांनी दिघी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादी वडमुखवाडी ते देहूफाटा या मार्गावरून जात असताना एका चोरट्याने फिर्यादी यांच्या हातातून 10 हजारांचा मोबाईल फोन चोरून नेला आहे.

सोनम जयप्रकाश उपाध्याय (वय 28, रा. पिंपळे सौदागर) यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. अज्ञात चोरट्याने शनिवारी (दि. 30) दुपारी साडेपाच वाजता फिर्यादी यांची 150 रुपये किमतीची पर्स चोरून नेली. त्या पर्समध्ये 53 हजार रुपये रोख रक्कम होती. याप्रकरणी पिंपरी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.