Pimpri News : पिंपरी – चिंचवड रनर्स क्लबचे अल्ट्रारनर भूषण तारक यांचे ‘बॉर्डर रन’मध्ये यश

एमपीसी न्यूज – द हेल रेस संस्थेतर्फे आयोजित करण्यात आलेल्या ‘बॉर्डर रन’मध्ये पिंपरी-चिंचवड रनर्स क्लबचे अल्ट्रारनर भूषण तारक यांनी यश संपादन केले आहे. त्यांनी 161 किलोमीटर अंतर 27 तास 39 मिनिटांमध्ये पूर्ण केले आहे. ही स्पर्धा राजस्थान मधील जैसलमेर येथे पार पडली.

‘द हेल रेस’ ही संस्था मागील चार वर्षांपासून ‘बॉर्डर रन’ या धावण्याच्या स्पर्धेचे आयोजन करते. 50 किलोमीटर, 100 किलोमीटर आणि 161 किलोमीटर अशा तीन प्रकारांमध्ये ही स्पर्धा असते. भारताच्या विविध भागातील स्पर्धक या स्पर्धेत सहभागी होतात. 18 डिसेंबर रोजी दुपारी 12.10 वाजता स्पर्धेला सुरुवात झाली.

पिंपरी-चिंचवड रनर्स क्लबचे अल्ट्रारनर भूषण तारक यांनी या स्पर्धेत सहभाग घेतला. भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव आणि भारत पाकिस्तान यांच्यात सन 1971 साली झालेल्या युद्धाला 50 वर्ष पूर्ण झाल्याने त्याच युद्ध भूमीवर धावून युद्धात शाहिद झालेल्या भारतीय जवानांना श्रद्धांजली वाहण्याची इच्छा मनी बाळगून भूषण यांनी सहभाग घेतला.

50 किलोमीटर अंतर आठ तासात, 100 किलोमीटर अंतर 16 तासात तर 161 किलोमीटर अंतर 28 तासात पूर्ण करण्याची अट होती. भूषण यांनी 161 किलोमीटर अंतराच्या प्रकारात सहभाग घेतला. सलग 28 तास धावत असताना कडक ऊन, रात्रीची थंडी अशा प्रतिकूल परिस्थितीत स्पर्धकांना धावावे लागणार होते. स्पर्धकांना पाणी आणि इतर आवश्यक वस्तू दर दहा किलोमीटरवर मिळणार होते. स्पर्धकांनी इतर मदत घेतल्यास ते स्पर्धेतून बाद होणार असल्याचा कठोर नियम असल्याने स्पर्धकांची खरी कसोटी होती.

या सर्व काठिण्य पातळ्या ओलांडून भूषण यांनी 27 तास 39 मिनिटांमध्ये ही रेस पूर्ण केली. ‘तुम्ही रस्त्यावरून धावत आहात. तुमच्या दोन्ही बाजूला वाळवंट आहे. रात्रीच्या वेळी तुटणारे तारे सहज नजरेला पडतात. सगळीकडे एकांत असताना धावण्याचा अनुभव खूप काही शिकवून जातो. त्यात देशप्रेमाची ऊर्जा धावण्याचे बळ देते. यातूनच ही स्पर्धा पूर्ण करता आली असल्याचे भूषण सांगतात.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.