Chinchwad : पाचक आणि रुचकर सातूचे पीठ

एमपीसी न्यूज- भारतीय नाश्त्याच्या पदार्थांमध्ये खूप वैविध्य जाणवते. पंजाबी,गुजराती,महाराष्ट्रीय, उत्तर भारतीय व दक्षिण भारतीय असे विविध नाश्त्याचे पदार्थ घराघरामध्ये केले जातात. महाराष्ट्र मध्ये उपमा,पोहे ,शिरा, फोडणीचा भात, पोळीचा कुस्करा, अंडी, पोळी भाजी, चहा-पोळी असे प्रकार सर्वात जास्त खाल्ले जातात. बऱ्याच लोकांमध्ये नाश्त्याबद्दल गैरसमज आहेत. यामधील एका एका पदार्थाबद्दल माहिती घेऊ.

सर्व घरामध्ये पोहे सर्वाधिक लोकप्रिय आहे. पोहे पचायला हलके असतात असा बऱ्याच जणांचा गैरसमज आहे. मात्र पोहे पचायला जड असतात व पचनाला त्रास देतात. 2000 वर्षापूर्वीच्या चरक या ग्रंथामध्ये सुद्धा असा उल्लेख आहे. सातत्याने पोहे खाणे हे पचन शक्ती बिघडलेल्यासाठी हानिकारक आहे. ज्या व्यक्तींना आम्लपित्त, अल्सर सारखा त्रास आहे ज्यांना बद्धकोष्ठता व मलावरोध आहे, त्यांना पोहे जास्त सोसवत नाही. तसेच मधुमेह, स्थूलता व अशा आजारामध्ये पोहे निषिद्ध मानावे. बऱ्याच लोकांना दूध पोहे खाण्याची सवय असते. हे मिश्रण सुद्धा शिरासाठी हानिकारक आहे. पोह्यांचा चिवडा बऱ्याच वेळा आम्लपित्त घडवतो. त्यामुळे पोह्यासारखे पदार्थ नियमितपणे नाश्त्या मध्ये घेऊ नये.

पोह्या खालोखाल आपल्याकडे आवडीचा पदार्थ उपमा होय. चांगल्या भाजलेल्या रव्याचा किवा ज्वारीचा उपमा तसा आरोग्यासाठी चांगला असतो. रवा किवा ज्वारीचे पीठ भाजून घेतल्याने तो पचायला हलका होतो .त्याचप्रमाणे त्यात कार्बोदके जास्त असल्यामुळे तो तात्काळ पोषण व उर्जा उपलब्ध करून देतो. उपमा अधिक पोषक करण्याकरिता त्यात विविध भाज्या घालता येतात. तो पचायला हलका असल्याने पचनशक्तीचे विकार, मधुमेह व इतर व्याधीमध्ये तो पथ्यकर आहे. गरोदर स्त्रिया, कृश व्यक्ती व प्रसव पश्चात स्त्रिया अशा व्यक्तींना चांगल्या तुपातील उपमा हा सुद्धा एक चांगल्या नाश्त्यातील पदार्थ होऊ शकतो. ज्यांना गोड पदार्थ आवडतात ते नाश्त्याला नेहमी शिरा खात असतात. शिऱ्यामध्ये देखील रवा व गव्हाचे पीठ भाजून घेतले असल्याने तसा तो पचवायला हलका असतो. यामध्ये चांगले तूप, वेलची टाकल्याने तो पदार्थ रुचीवर्धक व सुपाच्य होतो. बऱ्याच कुटुंबामध्ये दूध, सुकामेवा टाकले जातात पण अशा रीतीने तो पचायला जड होतो. असा शिरा नियमित रुपात सेवन करणे योग्य नाही. त्यामुळे वजन वाढू शकते.

धपाटे व थालीपीठ अथवा ठेपला हा सुद्धा नाश्त्यामध्ये नेहमी केला जाणारा पदार्थ. थालीपीठ किवा धपाटे हे प्रामुख्याने डाळीचे पीठ , गव्हाचे पीठ किवा ज्वारीचे पीठ यांच्या मिश्रणातून तयार होते. कधी कधी थालीपीठ हे भाजणीच्या पिठामधून सुद्धा तयार करतात. वरील वर्णन केलेले मिश्रण हे प्रथिने व कर्बोदके यांनी युक्त असल्याने ते आरोग्य करिता चांगले आणि पूर्ण अन्न म्हणून उपयुक्त ठरते. या पदार्थावर घेतले जाणारे साजूक तूप त्यांना रुचकर व पाचक बनवते. प्रथिने व कर्बोदके यांचे मिश्रण असल्याने शरीरातील सर्व पेशींना योग्य बल देण्याचे कार्य करते. असे मिश्रणयुक्त पदार्थ खाल्याने भूक सुद्धा खूप वेळा नियंत्रणात राहते. त्यामुळे असे पदार्थ अधूनमधून घेणे योग्य ठरते.

असाच एक महत्वाचा पदार्थ म्हणजे सातूचे पीठ. सातूचे पीठ हे प्रामुख्याने हरबरा, डाळ, गहू यांच्यापासून तयार होणारा पदार्थ. यामध्ये रुची वाढवण्यासाठी व पाचक बनवण्यासाठी सुंठ व जिरे यांचा वापर होतो. डाळ व गहू भाजून त्याचे पीठ केल्याने हा पदार्थ पचवायस एकदम हलका असतो. हा पारंपरिक पदार्थ एकदम पोषक असून शरीरास चिरकाली बल देणारा आहे. या पदार्थाची सर्वात जमेची बाजू म्हणजे याचा glycemic index अतिशय कमी आहे. त्यामुळे हा पदार्थ सर्व चयपयात्म्क आजारामध्ये विशेषतः मधुमेह व स्थूलता व pcod यासारख्या व्याधीमध्ये नियमित सेवन केल्यास चालतो. हा पदार्थ गरम दूध व पाणी घालून तयार करता येतो.

बऱ्याच कुटुंबामध्ये यात थोडे ताक घालून फोडणी देऊन सुद्धा खातात. सातूचे पीठ हा पदार्थ जुन्या काळी सैन्य रसद म्हणून घेऊन जायचे. याची प्रामुख्याने दोन कारणे होती. एक म्हणजे ते भाजलेले असल्याने ते टिकाऊ असते व त्याचे नियमित सेवनाने भरपूर शक्ती मिळते. याशिवाय ते अत्यंत रुचकर असते. म्हणून अशा पदार्थाचा वापर एकटे राहणारे विद्यार्थी किवा घरापासून दूर राहणारे लोक जे ब्रेड आम्लेट ,sandvich खातात त्यांच्यासाठी सातूचे पीठ हा एक आरोग्यकर व उत्तम पर्याय असू शकतो. अशक्त व्यक्तीमध्ये सातूच्या पिठामध्ये साखर किवा गूळ व दूध घालून खाल्यास खूप फायदा होतो. सातूचे पीठ पाचक रुचकर शीत असल्याने बऱ्याच व्याधीमध्ये पथ्यकर ठरते.

डॉ. विशाल मिसाळ (एम.डी)
9226932435

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.