Chinchwad : लेकी आता शारीरिक व मानसिक सक्षम झाल्या पाहिजेत : सविता व्होरा

एमपीसी न्यूज – लेकी वाचल्या पाहिजेत, शिकल्या पाहिजेत तशाच त्या शारिरीक व मानसिक देखील सक्षम झाल्या पाहिजेत. स्त्रियांना गुलाम करणारी व्यवस्था नाकारून काटेरी मार्गाने पुढे जात महिलांनी शिक्षण घेऊन आता स्वत:साठी राजमार्ग निर्माण केला आहे. या महिलांची प्रेरणा राजमाता जिजाऊ आणि सावित्रीबाई फुले आहेत. यांच्या जन्मस्थळाची माती देवाच्या भंडा-यापेक्षाही मौल्यवान आहे, असे मत अकलूजच्या ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या सविता व्होरा यांनी व्यक्त केले.

चिंचवडगावातील गांधी पेठ तालीम मित्र मंडळाच्या वतीने आयोजित जिजाऊ व्याख्यानमालेचे हे 28वे वर्ष आहे. चौथे पुष्प गुंफताना सविता व्होरा बोलत होत्या. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अश्विनी लक्ष्मण जगताप, नगरसेविका उषा मुंडे, नगरसेवक सुरेश भोईर तसेच गीतल गोलांडे, सुजाता पोफळे, सुजाता गोलांडे, सरीता कुलकर्णी, नानी रायकर, माजी नगरसेवक राजाभाऊ गोलांडे, सुहास पोफळे, रणजित व्होरा आदी उपस्थित होते.

सविता व्होरा म्हणाल्या की, महिलांनी स्वत:चा सन्मान स्वत: करायला शिकले पाहिजे. तोपर्यंत तुम्हाला कोणी मानसन्मान देणार नाही. कितीही त्रास अवहेलना झाल्या तरी महिला कठीण परिस्थितीला सामोरे जाऊन जिद्दीने पुढे जाऊ शकतात. अपंगत्वावर मात करून हिमालय सर करता येतो हे अरुनिमा सिन्हा हिने सिद्ध केले आहे. मुली जर शरीराने मनाने ताकदवान झाल्या तर आलेल्या संकटावर सक्षमपणे मात करतील आणि कोपर्डीसारख्या घटना घडणार नाही.

जिद्द, चिकाटीने मेहनत व शिक्षण करणा-या मुलींना जर मदतीचा हात मिळाला तर त्या आपल्या गावाचे, जिल्हयाचे नाव राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय पातळीवर नेतात. हे ग्रामीण भागातून आलेली महिला क्रिकेट पटू किरण नवघिरे हिने दाखवून दिले आहे. शहरी भागात महिलांना आरोग्याच्या ज्या सुविधा आहेत तशा सुविधा अशिक्षितपणामुळे, अंधश्रद्धेमुळे ग्रामीण भागातील महिला व मुलींना मिळत नाहीत. शहरी तसेच ग्रामीण भागात अनेक मुलींवर जवळच्याच नात्यागोत्यातील व्यक्तींकडून अन्याय अत्याचार होत असल्याच्या अनेक घटना शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थीनींचा सर्व्हे करताना उघडकीस आल्या आहेत. याबाबत महिलांनी जागरूक राहिले पाहिजे, असे व्होरा यांनी सांगितले.

या वेळी युपीएससी परीक्षेत निवड झालेल्या चिंचवडगावातील सागर नवनाथ शेळके यांचा संस्थेच्या वतीने सत्कार करण्यात आला.स्वागत सुजाता गोलांडे, तर सूत्रसंचालन वैशाली खोले, आभार सरिता कुलकर्णी यांनी मानले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.