Chinchwad: आदित्य बिर्ला रुग्णालयाला कोरोना बिलासंदर्भात सहा दिवसात दुसरी नोटीस

48 तासात मागविला खुलासा ; Second notice to Aditya Birla Hospital in six days regarding corona bill

एमपीसी न्यूज – मागील काही दिवसांपासून विविध कारणांनी चर्चेत असलेल्या चिंचवड येथील आदित्य बिर्ला मेमोरियल रुग्णालयाला सहा दिवसात दुसरी नोटीस बजाविली आहे. कोरोना बाधित रुग्णांच्या बिलांच्या तपासणी समितीस काही त्रुटी आढळल्याने समितीचे प्रमुख तथा आयकर विभागाचे सह आयुक्त एन. अशोक बाबू यांनी रुग्णालय प्रशासनाला कारणे दाखवा नोटीस बजाविली आहे. तसेच 48 तासात खुलासा मागविला आहे.

पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीमधील खासगी रुग्णालयामध्ये कोविड-19 या आजाराने बाधीत झालेल्या रुग्णांची येणारी वैद्यकीय खर्चाची बिले अवास्तव रकमांची येत आहेत. अशा स्वरुपाच्या लोकप्रतिनिधी, नागरिकांच्या तक्रारी प्राप्त झाल्याने विभागीय आयुक्त कार्यालयाने बिलांची तपासणी करण्यासाठी एक समिती नेमली आहे.

आयकर विभागाचे एन.अशोक बाबू  यांची पिंपरी-चिंचवड शहरातील कोविड रुग्णांवर उपचार करण्यात येत असलेल्या खासगी रुग्णालयामधील रुग्णांना शासकीय दरपत्रकाप्रमाणे व वाजवी दराने आकारणी केली जाते किंवा कसे? याची पडताळणी करण्याकामी नियुक्ती केली आहे.

एन.अशोक बाबू  यांनी 10 ऑगस्ट 2020 रोजी आदित्य बिर्ला मेमोरियल हॉस्पिटलला सकाळी साडेअकरा वाजता बिलांची तपासणी करण्यासाठी भेट दिली.

त्यावेळी वैद्यकीय समितीस काही त्रुटी आढळून आल्या. याबाबत रुग्णालयास कारणे दाखवा नोटीस बजाविण्यात आली. तसेच नोटीस मिळाल्यापासून 48 तासांमध्ये खुलासा करण्याबाबत कळविण्यात आले आहे.

दरम्यान, कोरोनाची सौम्य लक्षणे, गंभीर लक्षणे किंवा कोणतीही लक्षणे नसणाऱ्या रुग्णांना नाहक रुग्णालयात दाखल करून घेतल्याचा ठपका ठेवत आणि कोरोनाच्या रुग्णांना बील आकारणी करताना अनुज्ञेय नसलेल्या इतर विविध बाबींवर बिल आकारणी केली जात असल्याने  चिंचवड येथील आदित्य बिर्ला स्मृती रुग्णालय, पिंपरीतील डॉ. डी. वाय. पाटील रुग्णालय, सिटी केअर हॉस्पिटल आणि स्टार मल्टि स्पेशालिटी हॉस्पिटल प्रमुखांना 6 ऑगस्ट रोजी नोटिसा बजाविण्यात आल्या आहेत.

नियमांचे उल्लंघन केल्याने दंडात्मक कारवाई का, करू नये अशी विचारणा नोटीसद्वारे केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.