Chinchwad : सराफी दुकान फोडून सव्वासतरा लाखांच्या दागिन्याची चोरी; अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज – सराफी दुकान फोडून अज्ञात चोरट्यांनी सुमारे 17 लाख 27 हजार 500 रुपयांचे सोन्या-चांदीचे दागिने चोरून नेले. यामध्ये 55 ग्रॅम सोने तर 42 किलो 500 ग्रॅम चांदीचा समावेश आहे. याप्रकरणी अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार सोमवारी (दि. 20) सकाळी उघडकीस आला आहे.

चंपालाल हुक्माराम चौधरी (वय 39, रा. वाल्हेकरवाडी, चिंचवड) यांनी याप्रकरणी चिंचवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी चौधरी यांचे गुरुद्वारा चौक, वाल्हेकरवाडी येथे ‘बालाजी ज्वेलर्स’ हे सराफी दुकान आहे. रविवारी (दि. 19) रात्री नऊ वाजता त्यांनी दुकान कुलूप लावून बंद केले. रात्री अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या दुकानाचे शटर उचकटून आत प्रवेश केला.

दुकानातून 1 लाख 75 हजार रुपयांचे 55 ग्रॅम सोन्याचे आणि 14 लाख 87 हजार 500 रुपयांचे 42 किलो 500 ग्रॅम वजनाचे चांदीचे असे एकूण 17 लाख 27 हजार 500 रुपये किमतीचे दागिने चोरून नेले.

सोमवारी सकाळी साडेसातच्या सुमारास फिर्यादी चौधरी दुकान उघडत असताना हा प्रकार उघडकीस आला. याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला असून चिंचवड पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.