BNR-HDR-TOP-Mobile

Chinchwad : पिंपरी पोलिसांनी खोटा गुन्हा दाखल केल्याचे शिवसेना पदाधिका-याचे पोलीस आयुक्तांना निवेदन

दारू पिऊन गोंधळ घालणा-या शिवसेना शाखा प्रमुखाला अटक प्रकरण

एमपीसी न्यूज – गणेश विसर्जन मिरवणुकीत दारू पिऊन गोंधळ घातल्याप्रकरणी पिंपरी पोलिसांनी शिवसेना पदाधिका-याला अटक केली. तसेच त्याच्यावर गुन्हा दाखल केला. मात्र, हा खोटा गुन्हा आपल्यावर दाखल केल्याचे निवेदन शिवसेना पदाधिका-याने पोलीस आयुक्तांना दिले.

विजय सर्जेराव सूर्वे (वय 38, रा. बालाजी हाईटस्‌, मोहननगर, चिंचवड) असे अटक केलेल्या शिवसेना पदाधिका-याचे नाव आहे. पोलीस कर्मचारी विद्यासागर भोते यांनी याबाबत पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विजय सुर्वे हा मोहननगर शिवसेना शाखाप्रमुख आहे. गुरुवारी रात्री गणेश विसर्जन मिरवणुकीत सुर्वे याने दारू पिऊन गोंधळ घातला. याबाबत त्याच्यावर मुंबई दारूबंदी कायदा व महाराष्ट्र पोलीस अधिनियमान्वये गुन्हा दाखल करून अटक केली.

दरम्यान, या प्रकरणाच्या विरोधात सुर्वे यांनी पोलीस आयुक्‍तांना तक्रार अर्ज दिला आहे. आपले मोहननगर परिसरात वाशिंग सेंटर असून पोलीस अधिकारी अन्सार शेख यांना फुकटात मोटार धुवून देत नसल्याने त्यांनी आपल्याला या खोट्या प्रकरणात अडकविले असल्याचे तक्रारीत म्हटले आहे. मोहननगर परिसरातील मिरवणुक पाहत उभा असताना पोलीस अधिकारी अन्सार शेख माझ्याजवळ आले. त्यांनी मला धक्कबुक्की करत पोलीस चौकीत घेऊन गेल्याचेही तक्रारीत म्हटले आहे.

मात्र, अन्सार शेख यांनी या आरोपाचे खंडण करीत आपल्या घरी मोटार धुण्यासाठी गेल्या एक वर्षापासून नेपाळी व्यक्‍ती असल्याचा खुलासा केला आहे.

HB_POST_END_FTR-A2

.