Chinchwad : बुधवारपासून रंगणार सिद्धिविनायक व्याख्यानमाला

एमपीसी न्यूज – स्वातंत्र्यवीर सावरकर प्रतिष्ठान आणि स्वातंत्र्यवीर सावरकर मित्रमंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने चिंचवड येथे सिध्दिविनायक व्याख्यानमाला आयोजित करण्यात आली आहे. बुधवार (दि. 6) ते दि. शुक्रवार (दि. 8) फेब्रुवारी दरम्यान दररोज सायंकाळी सात वाजता चिंचवड येथील सिद्धिविनायक मंदिरात ही व्याख्यानमाला होणार आहे.

खासदार श्रीरंग बारणे यांच्या हस्ते व्याख्यानमालेचे उद्घाटन होणार असून आमदार गौतम चाबुकस्वार, पिंपरी-चिंचवड महापालिका सत्तारूढ पक्षनेता एकनाथ पवार, नगरसेविका मंगला कदम, नगरसेविका अनुराधा गोरखे, नगरसेवक तुषार हिंगे, नगरसेवक केशव घोळवे, माजी नगरसेवक मधुकर बाबर, नारायण बहिरवाडे, प्रकाश बाबर आणि शिवसेना शहरप्रमुख योगेश बाबर आदी उपस्थित राहणार आहेत.

बुधवारी (दि. 6) सातारा येथील प्रा. डॉ. शिवाजीराव चव्हाण ‘प्रतापगडचे युद्ध’ या विषयावर पहिले पुष्प गुंफतील. गुरुवारी (दि. 7) पुण्यातील युवा व्याख्याते आशुतोष झा ‘हिंदुत्व : एक आदर्श जीवनप्रणाली’ या विषयावर आपले विचार व्यक्त करतील. शुक्रवारी (दि. 8) कवी बंडा जोशी, अनिल दीक्षित आणि भालचंद्र कोळपकर ‘हास्यमैफल’ या विनोदी कवितांच्या कार्यक्रमाद्वारे अंतिम पुष्पाची गुंफण करतील.

स्वातंत्र्यवीर सावरकर प्रतिष्ठानच्या सोळाव्या वर्धापनदिनाचे आणि गणेश जयंतीचे औचित्य साधून विविध धार्मिक कार्यक्रमांचे तसेच महाप्रसाद, सत्संगाचे आयोजन मंदिराच्या प्रांगणात करण्यात आलेले आहे. या सर्व कार्यक्रमांचा नागरिकांनी आवर्जून लाभ घ्यावा, असे आवाहन संयोजकांनी केले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.