Chinchwad : अवैधरित्या दारू विक्री करणाऱ्या सहा जणांकडून पावणे आठ लाखांचा मुद्देमाल जप्त

एमपीसी न्यूज – पिंपरी चिंचवड पोलिसांनी अवैधरित्या दारू विक्री करणाऱ्या सहा व्यक्तींवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.  तसेच त्यांच्याकडून 7 लाख 80 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.

कोरोना विषाणूचे संक्रमण रोखण्यासाठी संपूर्ण भारतात लॉकडाऊन करण्यात आले आहे. महाराष्ट्र राज्यात केवळ जीवनावश्यक वस्तूंची विक्री सुरू ठेवण्यात आली असून मद्य विक्रीसाठी मनाई करण्यात आली आहे. त्यामुळे पोलिसांकडून शहरात सुरू असलेल्या अवैधरित्या दारू विक्री केंद्रांवर छापे मारून गुन्हे दाखल करण्यात येत आहेत.

खंडणी दरोडा विरोधी पथकाने खालुम्ब्रे चाकण येथे एका स्कॉर्पिओ कार (एमएच 14 / एसएक्स 7124) मधून 27 हजार 410 रुपयांचा गुटखा आणि 7 लाख रुपये किंमतीची कार जप्त केली. तसेच या प्रकरणात हनुमान रुपाराम चौधरी याला अटक करण्यात आली आहे. तसेच पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखेच्या विविध पथकांनी वेगवेगळ्या कारवायांमध्ये पाच जणांना अटक करत 52 हजार 964 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना मास्क, सॅनिटायझरचे वाटप 

 पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाकडून पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना तीन हजार मास्क, सॅनिटायझर, रोगप्रतिकारक शक्ति सुधारण्याचे औषध यांचे वाटप करण्यात आले. कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर पोलिसांना दैनंदिन कर्तव्य करताना त्यांचे आरोग्य उत्तम राहावे यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून पोलिसांना वेळोवेळी महत्वपूर्ण सुचना देण्यात आल्या आहेत.

अमली पदार्थ विरोधी पथक व आर्थिक गुन्हे शाखेच्या वतीने यमुनानगर पोलीस चौकी येथे 50 गरजू कुटुंबांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले. त्यामध्ये तांदूळ, गहू, साखर, तेल, डाळ, साबण, चहा पावडर, सॅनिटायझर, डेटॉल हॅन्डवॉश अशा वस्तूंचा समावेश होता.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.