_MPC_DIR_MPU_III

Chinchwad : बाउन्सर आणि त्याच्या साथीदाराकडून सहा पिस्टल, 15 काडतुसे जप्त

पिंपरी चिंचवड गुन्हे शाखेच्या युनिट चारची कारवाई

एमपीसी न्यूज – कार शोरूममध्ये काम करणा-या बाउन्सर आणि परळी वैजनाथ येथे वसुलीचे काम करणा-या एका सराईत गुन्हेगाराला पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखेच्या युनिट चारच्या पोलिसांनी अटक केली. दोघांकडून सहा पिस्टल आणि 15 काडतुसे जप्त करण्यात आली आहेत. बेकायदेशीरपणे विक्री करण्यासाठी त्यांनी पिस्तूलची खरेदी केली असल्याचे समोर आले आहे. पोलीस आयुक्त संदीप बिष्णोई यांनी याबाबत पत्रकार परिषदेत माहिती दिली.

_MPC_DIR_MPU_IV

गणेश मारुती साळी (वय 26, रा. जुनी सांगवी), ग्यानोबा उर्फ गोटू मारुती गित्ते (वय 30, रा. नंदागौळ, ता. परळी, जि. बीड) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.

गुन्हे शाखा युनिट चारचे पोलीस रेकॉर्डवरील गुन्हेगार चेक करत फिरत असताना पोलीस नाईक लक्ष्मण आढारी यांना माहिती मिळाली की, काळेवाडी येथील लकी बेकरी समोर एक व्यक्ती संशयितरित्या थांबला असून त्याच्याकडे पिस्टल आहे. त्यानुसार पोलिसांनी परिसरात सापळा रचून गणेश याला ताब्यात घेतले. त्याची झडती घेतली असता त्याच्याकडे एक पिस्टल आणि दोन जिवंत काडतुसे तसेच पिस्टल सारखे दिसणारे लायटर आढळून आले. याबाबत त्याला अटक करून वाकड पोलीस ठाण्यात शस्त्र अधिनियम आणि महाराष्ट्र पोलीस कायद्यान्वये गुन्हा दाखल केला.

आरोपी गणेश याने पिस्टल कुठून आणि का आणले, याबाबत पोलिसांनी त्याच्याकडे चौकशी केली. त्यामध्ये त्याने परळी येथील ग्यानोबा याच्याकडून पिस्तूल आणल्याचे सांगितले. पोलिसांनी परळी येथे शोध घेऊन ग्यानोबा याला अटक केली. ग्यानोबा याच्यावर परळी शहर, परळी ग्रामीण, युसूफ वडगाव, रेणापूर लातूर, शिवाजीनगर पुणे, स्वारगेट पुणे आदी पोलीस ठाण्यात खून, दरोडा, खंडणी, जबरी चोरी, वाहन चोरी असे 23 गुन्हे दाखल आहेत.

आरोपी ग्यानोबा याने कालू सिंग जसवंत सिंग (रा. सिंघाणा, ता. मनावर, जि. धार, मध्यप्रदेश) याच्याकडून पाच पिस्टल आणि 15 जिवंत काडतुसे व एक गावठी कट्टा विकत घेतल्याचे सांगितले. त्यातील दोन पिस्टल आणि दोन काडतुसे गणेश याला विकल्या आणि अन्य पिस्टल आणि काडतुसे विक्रीसाठी लपवून ठेवल्याचेही आरोपीने पोलीस तपासात सांगितले. पोलिसांनी एक लाख 64 हजार रुपयांचे सहा पिस्टल आणि 15 जिवंत काडतुसे व पिस्टल सारखे दिसणारे लायटर जप्त केले.

आरोपी गणेश हा वाकड येथील एका कार शोरूममध्ये बाउन्सरचे काम करत होता. तर आरोपी ग्यानोबा हा परळी वैजनाथ येथील एका फायनान्स कंपनीत वसुलीचे काम करत होता. शस्त्र पुरवणारा कालू हा अद्याप फरार असून त्याचा शोध पोलीस घेत आहेत. युनिट चारने केलेल्या कारवाईचे पोलीस आयुक्तांनी कौतुक केले. तसेच पथकाला रिवॉर्ड देखील देण्यात येणार असल्याचे आयुक्तांनी सांगितले.

_MPC_DIR_MPU_II

ही कारवाई पोलीस आयुक्त संदीप बिष्णोई, अपर आयुक्त रामनाथ पोकळे, उपायुक्त सुधीर हिरेमठ, सहाय्यक आयुक्त श्रीधर जाधव, यांच्या मार्गदर्शनाखालील गुन्हे शाखा युनिट चारचे वरिष्ठ निरीक्षक मोहन शिंदे, सहाय्यक निरीक्षक अंबरिष देशमुख, पोलीस कर्मचारी वासुदेव मुंडे, आदिनाथ मिसाळ, संजय गवारे, नारायण जाधव, प्रवीण दळे, धर्मराज आवटे, दादाभाऊ पवार, शावरसिद्ध पांढरे, लक्ष्मण आढारी, गौस नदाफ, तुषार शेटे, सुनील गुट्टे, प्रशांत सैद, तुषार काळे, सुरेश जायभाये, गोविंद चव्हाण, अजिनाथ ओंबासे, धनाजी शिंदे, सुखदेव गावंडे, नागेश माळी यांच्या पथकाने केली आहे.

शहरातील सर्व बाउन्सरचे रेकॉर्ड तपासणार – पोलीस आयुक्त

शहरात कार्यरत असलेल्या विविध सुरक्षा एजन्सीच्या माध्यमातून काम करणा-या सर्व बाउन्सरचे संपूर्ण रेकॉर्ड तपासण्यात येणार आहे. याबाबतच्या सूचना पोलीस आयुक्त संदीप बिष्णोई यांनी दिल्या आहेत. गुन्हे शाखा युनिट चारच्या पोलिसांनी एका बाउन्सरला अटक केली. त्याच्याकडून पिस्टल जप्त केले आहे. त्यामुळे सुरक्षा पुरविणा-या बाउन्सरकडे अशा प्रकारे बेकायदेशीर शस्त्र आढळण्याच्या घटनेला पोलिसांनी गांभीर्याने घेतले आहे. सर्व बाउन्सरचे रेकॉर्ड काढून ज्यांच्यावर यापूर्वी गुन्हे आहेत, त्यांच्यावर योग्य ती कारवाई केली जाणार आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पोलीस आयुक्तांची पत्रकार परिषद उन्हात

सध्या जगभर कोरोनाची चर्चा आहे. पिंपरी-चिंचवड शहरात देखील कोरोनाचा प्रसार झाला आहे. याची धास्ती सर्वच प्रशासकीय विभागांनी घेतली आहे. सर्व पातळ्यांवर उपाययोजना आणि काळजी घेतली जात आहे. पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखेच्या युनिट चारच्या पथकाने केलेल्या उत्तम कारवाई बाबत आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेला पोलीस आयुक्त संदीप बिष्णोई यांनी चक्क उन्हात संबोधित केले. पत्रकार परिषदेसाठी पत्रकार, पोलीस बांधव मोठ्या संख्येने उपस्थित राहतात. त्यामुळे खबरदारी म्हणून पत्रकार परिषद खुल्या वातावरणात घेण्यात आली.

_MPC_DIR_MPU_I

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.